Fri, Jul 19, 2019 19:53होमपेज › Nashik › निफाड विकासकामांच्या उद्घाटनाचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण

निफाड विकासकामांच्या उद्घाटनाचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 28 2018 10:32PMओझर : वार्ताहर

निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच सरकारच्या माध्यमातून ओझर येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचे निमंत्रण आमदार कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. यावेळी ठाकरे यांनी नक्‍की येण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

निफाड तालुक्यात मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी आमदार कदम यांच्या नेतृत्वाखाली निफाड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांशी संवाद साधत निफाड तालुका व शिवसेनाप्रमुख यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आमदार कदम शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेला विकास करीत असल्याचे गौरवोद‍्गार काढले. कदम यांच्या रूपाने निफाड तालुक्याला अभ्यासू व कार्यक्षम लोकप्रतिनिधी मिळाल्याचे सांगत निफाड तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

आमदार कदम यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील दळणवळणाच्या द‍ृष्टीने महत्त्वाचा असलेल्या पिंपळगाव-निफाड-चांदवड या रस्त्याचे भूमिपूजन, पिंपळगाव (बसवंत) येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे उद्घाटन, ओझर येथे रोजगार मेळाव्यासाठी येण्याचे निमंत्रण पक्षप्रमुखांना दिले. तसेच साकोरे (मिग)-वडाळी नजीक (3.30 कोटी), कुंदेवाडी ते खडकजांब (4.18 कोटी), सायखेडा ते मांजरगाव (4.23 कोटी), खेरवाडी ते सायखेडा (7 कोटी), चिंचखेड चौफुली ते पिंपळगाव मार्केट (13 कोटी) या कामांबरोबरच तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे आगामी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असल्याचे यावेळी सांगितले. या शिष्टमंडळात निफाड पंचायत समिती सभापती राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, दीपक शिरसाठ, सुधीर कराड, शिवा सुरासे, आशिष बागूल, मुकुंदराजे होळकर, सुजीत मोरे, किरण शेळके आदी उपस्थित होते.