Sun, Jul 21, 2019 09:50होमपेज › Nashik › उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये

उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 06 2018 12:01AMनाशिक : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (दि.6) नाशिकमध्ये येत असून, हॉटेल ताजमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांची ते बैठक घेणार आहेत. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

ठाकरे यांनी या आधी विदर्भ, कोकणचा दौरा केला आहे. वर्षाअखेर लोकसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी आधीच केली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ते संपूूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राची होत असलेली बैठक त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येते. यावेळी ते विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, आमदार, खासदारांशी संवाद साधणार आहेत. त्या-त्या भागातील परिस्थिती ते जाणून घेणार आहेत.

सकाळी नऊला बैठकीला सुरुवात होणार असून, दिवसभर सुरू राहणार आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून रिंगणात असलेले शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज बाद होता-होता राहिला. यात भाजपाने सत्तेचा वापर केल्याची चर्चा रंगली होती. तसेच दराडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसेनेतील काही जण नाराज झाले आहेत. बैठकीच्या अनुषंगाने ठाकरे नाराजांना हेरून दराडे यांना निवडून आणण्यासाठी संबंधितांना कानमंत्र देण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या पुत्राचा विवाह सोहळाही याचदिवशी असून, ठाकरे याप्रसंगी हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले.