Sun, Jul 21, 2019 10:03होमपेज › Nashik › नाशिकची डॉ. विशाखा भदाणे युपीएससीत झळकली

नाशिकची डॉ. विशाखा भदाणे युपीएससीत झळकली

Published On: Apr 27 2018 10:06PM | Last Updated: Apr 27 2018 10:06PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत नाशिकमधील डॉ. विशाखा अशोक भदाणे या विद्यार्थिनीने देशात ७८३ वी रँक मिळविली आहे. पंचवटीतील मखमलाबाद येथील रहिवासी असलेल्या विशाखा हिने तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. भदाणे कुटुंबिय मूळचे सटाणा तालु्क्यातील आरई येथील असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते नाशिकमध्ये स्थायिक झाले आहेत. आई-वडील, एक भाऊ, आणि दोघी बहिणी असे तिचे कुटूंब आहे. मोठा भाऊ डॉक्टर, तर बहिण योगशिक्षक आहे. वडील गांधीनगर येथील जनता विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. 

पंचवटीतील गणेशवाडी आयुर्वेदीक महाविद्यालयातून २०१३ मध्ये बीएएमएसची पदवी प्राप्त केल्यानंतर २०१५ पासून तिने युपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. दोन वेळा आलेल्या अपयशानंतरही खचून न जाता विशाखाने प्रयत्न सुरूच ठेवले. आयएएस व्हायचेच, या जिद्दीने तिने अहोरात्र मेहनत घेऊन अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविलेच. युपीएससीची संपूर्ण तयारी नाशिकमध्येच केल्याचे तिने आवर्जून सांगितले. 

परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल विशाखा म्हणाली की, प्रशासकीय सेवेत दाखल झालो तर समाजामध्ये काहीतरी बदल घडवून आणू शकतो, असा विश्वास होता. त्यामुळेच युपीएससीच्या अभ्यासाला सुरूवात केली. गेल्या तीन वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीला यश मिळाले. आज निकाल ऐकल्यानंतर खूप आनंद झाला आहे. यापुढेही प्रयत्न सुरूच ठेवणार असून, आयएएस होणे हेच माझे खरे स्वप्न आहे, अशी भावना विशाखाने बोलून दाखवली.

नाशिकच्या मुलांना युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली, मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज नाही, हे याआधीदेखील युपीएससीच्या निकालाने सिद्ध केले आहे. नाशकातच अभ्यास करून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. इथल्या तरुणांमध्ये जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यानेच युपीएससीत त्यांना यश मिळत आहे. विशाखा ही खरोखरच खूप हुशार आणि जिद्दी विद्यार्थिनी आहे. यावेळेला ती यश मिळवेलच, ही अपेक्षा होती आणि तिने ती पूर्ण केली, अशी प्रतिक्रिया संचालक, युनिवर्सल फाउंडेशनच्या संचालक राम खैरनार यांनी दिली आहे.

Tags : UPSC, Civil Services Exam 2018, Final Result, Nashik, Dr Vishakha Bhadane,