Sat, Jul 04, 2020 01:29होमपेज › Nashik › नाशिक,मालेगाव, नगर, मुंबईत दुचाकी चोरणारे दोघे अट्टल जेरबंद

नाशिक,मालेगाव, नगर, मुंबईत दुचाकी चोरणारे दोघे अट्टल जेरबंद

Published On: May 16 2019 2:09AM | Last Updated: May 16 2019 12:19AM
मालेगाव : प्रतिनिधी

छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हद्दीसह नाशिक, नगर, मुंबई शहरातील दुचाकी चोरीचा तपास लावला आहे. नऊ दुचाकींसह दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी ‘छावणी’त पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. प्रमुख शासकीय कार्यालय व व्यापारी आस्थापना असलेल्या छावणी हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक आहे. अलीकडच्या काळात वाढलेल्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रविण वाडिले यांनी तपास पथक गठीत केले. 

या पथकाने चोरट्यांचा माग काढताना शहरात दोघे जण दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळविली. त्यानुसार दि. 12 मे रोजी समाधान काशिनाथ शिंदे (24, रा. वनपट, हल्ली मु. टिंगरी) व विलास ऊर्फ हिलाल भास्कर पवार (30, रा. आर्वी, ता. धुळे) यांना शिताफीने पकडण्यात आले. तपासात त्यांनी छावणी हद्दीतील पाच दुचाकी चोरीसह मुंबई, नाशिक, नगरमधील चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोघे चोरटे ग्रामीण भागातील असून, मोलमजुरी करतात. संधी मिळताच दुचाकी चोरतात, आणि त्यांची कवडीमोल किंमतीत विक्री करतात, असे नवले यांनी सांगितले.

गेल्या पाच महिन्यात ‘छावणी’च्या पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलीसनाईक अविनाश राठोड, महेश गवळी, शिपाई पंकज भोये, नितीन बारहाते, नरेंद्रकुमार कोळी, संजय पाटील, महेंद्र पवार, संदीप राठोड यांच्या पथकाने 32 चोरीच्या दुचाकी जप्त करुन आरोपींना पकडण्यात यश मिळविले आहे.