Fri, Apr 26, 2019 10:01होमपेज › Nashik › जिल्ह्यात दोन जण बुडाले

जिल्ह्यात दोन जण बुडाले

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 01 2018 10:48PMसिन्‍नर/वणी : वार्ताहर

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.1) दोन जण बुडाल्याची घटना घडली आहे. दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील नदीवर आंघोळीसाठी गेलेला युवक बुडाला असून, त्याला शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाची शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तर, दुसर्‍या घटनेत सिन्‍नर तालुक्यातील विंचूर दळवी येथे सहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, अवनखेड येथील कादवा नदीत विकास निकम (30) आणि त्याचे दोन भाऊ पोहण्यासाठी गेले होते. विकास निकम हा पोहण्यासाठी नदीत उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना त्याच्या भावाने बघितल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी पुलावरून पाण्यात उडी मारली. परंतु, विकास हा पाण्यात बुडालेला होता. त्यामुळे त्याला वाचवण्यात अपयश आले. दिंडोरी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, आमदार नरहरी झिरवाळ घटनास्थळी दाखल झाले. खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी दत्तक घेतलेले अवनखेड गाव आहे.

दुसर्‍या घटनेत कडवा कालव्यात विंचूर दळवी येथील साईराज मनोहर तांबे (13) हा शाळा सुटल्यावर घरी गेला. त्यानंतर तो चौथीत शिकणार्‍या ओम राजू पांडे (12) या मित्रासोबत जामगाव रस्त्याजवळून वाहणार्‍या कडवा कालव्यावर आंघोळीसाठी गेला. दोघेही कालव्यात उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्याने साईराज बुडाला. ओमने आरडाओरडा केल्यानंतर रस्त्याने जाणार्‍या संपत डांगे यांनी कालव्याच्या दिशेने धाव घेतली. ओमला वाचविण्यात डांगेंना यश आले. मात्र, साईराजचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्‍नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार विनोद टिळे तपास करीत आहे.