Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Nashik › नाशिक विभागात होणार दोन ‘ओजस’ शाळा

नाशिक विभागात होणार दोन ‘ओजस’ शाळा

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 02 2017 12:08AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

राज्यात शंभर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या शाळा नेमक्या कशा असाव्यात, याचे उदाहरण म्हणून आधी 10 शाळा तयार करण्यात येणार आहेत. संपूर्ण राज्यभरात एकूण 10 शाळांची निवड करण्यात आली असून, त्यात नाशिक विभागातील दोन शाळांचा समावेश आहे.

मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, या हेतूने जिल्हा परिषद, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील निकष निश्‍चित करण्यात आले आहे. शंभर शाळा नेमक्या कशा पद्धतीने तयार करण्यात याव्यात, याचे उदाहरण म्हणून राज्यभरातून 10 शाळा आंतरराष्ट्रीय करण्यात येणार आहे. या शाळांची निवड करण्यात आली आहे. या 10  शाळांना ‘ओजस’ म्हणून संबोधण्यात येणार आहे. त्यानंतर या शाळा परिसरातील किमान नऊ शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा  करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत. या नऊ शाळांना ‘तेजस’ संबोधण्यात येणार आहेत.

संपूर्ण राज्यभरात म्हणजे विभागनिहाय ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोकण, पुणे विभाग प्रत्येकी एक तर औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि नागपूर विभागातून प्रत्येकी दोन शाळांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातून एक तर संबंधित जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून किमान दोन शाळांची ‘तेजस’ शाळेसाठी निवड करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येकी दोन शाळा ‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात येणार आहे. ‘ओजस’ आणि ‘तेजस’ शाळांच्या निवडीचे काम डिसेंबर महिन्यात पूर्ण करावे लागणार  आहे. ‘ओजस’ शाळेसाठी शिक्षकांची निवड याच कालावधीत होणार आहे. जानेवारीत आंतरराष्ट्रीय शाळा व शिक्षकांच्या निवडीचे आदेश काढण्यात येणार आहेत. फेबु्रवारी 2018 पासून ‘ओजस’ आणि ‘तेजस’ या शाळांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.  ‘ओजस’ शाळेसाठी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष, महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत सहकार्य व मार्गदर्शन फेबुवारीपासूनच होणार आहे. त्यानंतर जून 2019 पासून ‘ओजस’ शाळा या ‘तेजस’ शाळांना सहकार्य आणि मार्गदर्शन करणार आहेत. ‘ओजस’ आणि ‘तेजस’ शाळा मार्च 2021 आणि मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय चाचण्यांना सामोर्‍या जाणार आहेत.