होमपेज › Nashik › दोन अधिकार्‍यांच्या संघर्षात नाशिकवर पाणीकपातीचे सावट

दोन अधिकार्‍यांच्या संघर्षात नाशिकवर पाणीकपातीचे सावट

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 15 2018 1:24AMनाशिक : प्रतिनिधी

कश्यपीचे पाणी नाकारणार्‍या महापालिका प्रशासनाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पुढील वर्षीच्या पाणी आरक्षणावरून हिसका दाखविण्यास सुरुवात केली आहे. शहरासाठी गंगापूर धरणातून 33 टक्के पाणी कपातीचे संकेत दिले आहे. शहरासाठी पुढील वर्षासाठी धरणात 4400  ऐवजी केवळ 3000 दलघफू पाणी देण्याचे संकेत देतानाच पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.त्यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.14) टंचाई आढावा बैठक पार पडली. यंदा आठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन आतापासूनच करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी यंत्रणांना दिले. पावसाने हुलकावणी दिल्याने धरणांमधील उपलब्ध साठा बघता नाशिक शहरासाठी गतवर्षीप्रमाणे पाणी देणे शक्य होणार नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. परिणामी आतापासूनच पाण्याचे नियोजन करताना गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी मनपाला सांगितले. 

दरवर्षी 31 ऑक्टोबर ते 31 जुलै या काळासाठी धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून त्यानुसार पाणीवापर संस्थांचे आरक्षण केले जाते. महापालिकेला गतवर्षी 4400 दलघफू पाणी देण्यात आले होते. त्यात गंगापूरमधून 3900 दलघफू तर दारणातील 500 दलघफू पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, यंदा जिल्हाधिकार्‍यांनी या आरक्षणात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 14 लाख 88 हजार आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्या विचारात घेता सध्या शहराची लोकसंख्या 17 लाखाच्या आसपास असल्याने 2700 दलघफू पाण्याची आवश्यकता आहे. तसेच पाणी गळती विचारात घेता अतिरिक्त 300 दलघफू पाणी देत एकूण 3000 दलघफूपर्यंत पाण्याचे शहरासाठी आरक्षण देण्यात येईल. त्यामुळे मनपाचे आतापासूनच पाण्याच्या नियोजनावर भर देण्याचा सल्ला जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी मनपाच्या अधिकार्‍यांना दिला. परिणामी नाशिककरांना पुढील वर्षात पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

बैठकीला जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार शरद घोरपडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, मनपा व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

नाशिककरांवर होणार अन्याय 

गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात कश्यपी धरणग्रस्तांच्या  बैठकीत कश्यपीच्या पाण्याची गरज नसल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. यावरून जिल्हाधिकार्‍यांनी ऑक्टोबरच्या पाणी आरक्षणावेळी तुम्हाला दाखवितो, असा इशाराच दिला होता; त्यामुळेच तो धागा पकडत जिल्हाधिकार्‍यांनी थेट गंगापूरमधील नाशिक शहराच्या पाणी आरक्षणात कपात करण्याची तयारीच जणू सुरू केली आहे. दोन यंत्रणांमधील प्रतिष्ठेच्या मुद्यावरून नाशिककरांवर अन्याय होणार आहे. दरम्यान, धरणातील अतिरिक्त पाण्याचे जिल्हाधिकारी कसे नियोजन करणार, हे पाणी जिल्ह्यासाठीच वापरणार की मराठवाड्याला सोडणार हे प्रश्‍न अनुत्तरित आहे.