कोरोनाच्या औषधाची मात्रा 'बाबा'वरच उलटली..!

Last Updated: May 29 2020 3:53PM
Responsive image
सोशल मिडीयावर फिरणारी पोस्ट (किसन वाघमारे बाबा)

सोशल मीडियावर कोरोनाविषयी मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या भोंदूबाबासह दोन नेटक-यांवर पेठ येथे गुन्हा दाखल


पेठ (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर औषध शोधण्याचा दावा करत गुरूवारी (दि. २८) या रोगाबाबत भव्य मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या अंबापानी (ता. पेठ) येथील एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियावर पसरवून साथरोग प्रतिबंधक अधिनियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन नेटकऱ्यांवर पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेठ तालुक्यातील अंबापानी येथील किसन वाघमारे (बाबा) याने कोरोना (कोविड-१९) आजारावर उपचारार्थ हजारोंच्या संख्येने लोकांनी गुरूवार दि. २८ रोजी अंबापानी येथे दुपारी जमावे असे आवाहन सोशल मीडियाव्दारे केले होते. याच फसव्या माहितीचा प्रसार रवींद्र बेंडकुळे (गाव अनभिज्ञ) व काशिनाथ चारोस्कर (रा. महाजे, ता.दिंडोरी) यासह किसन वाघमारे (बाबा) या तिघांनी सोशल मीडियावर केल्याने अफवा पसरवून साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत या तिघांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. वसावे करत आहेत.