होमपेज › Nashik › गावठी कट्टा, काडतूस, हत्यारांसह एकास अटक

गावठी कट्टा, काडतूस, हत्यारांसह एकास अटक

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 17 2018 10:53PMमालेगाव : प्रतिनिधी

मालेगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस, चॉपर, तीन मोबाइलसह एकाला अटक केली. तसेच दोन दिवसात मालेगाव, सटाणा, चांदवड, मनमाड या भागातून दहा प्राणघातक हत्यारांसह दहा जणांनाही अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांंनी दिली.

अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांडामध्ये अग्निशस्त्रांचा वापर झाला. त्या पार्श्‍वभूमीवर पोलीस विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे नाशिक परिक्षेत्रात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर अधीक्षक पोद्दार यांनी गुन्हेगारांची शोध मोहीम घेतली. त्यांतर्गत शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक एस. डी. वांगडे यांना बुधवारी (दि.16) शेख सलमान शेख सलीम उर्फ शहजाद डी याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक वाय. ए. चव्हाण, हवालदार एस. डी. बाविस्कर, एस. डी. धारणकर, बी. पी. गांगुर्डे, ए. एस. डामसे, एन. जे. शेलार यांना सोबत घेत बाग-ए-कासिम भागातील शेख सलमानच्या घराची झडती घेतली. पत्र्याच्या खोलीतील बाथरुममध्ये कपड्याचे गाठोडे आढळले. त्यात गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस, चॉपर, तीन मोबाइल असा आठ हजार 300 रुपयांचा ऐवज निघाला. आरोपीला पवारवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. कार्यक्षेत्रातूनही दहा आरोपींना तलवार, सुर्‍यासह पकडले. याप्रसंगी निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, उपनिरीक्षक युवराज चौहान, गणेश शेळके आदी उपस्थित होते.