Sun, Aug 18, 2019 21:20होमपेज › Nashik › एकाच प्रकरणात दोन वेगवेगळे निकाल!

एकाच प्रकरणात दोन वेगवेगळे निकाल!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

कळवण तालुक्यातील मौजे निवाणे येथील एका शेतकर्‍याच्या वारस नोंदीच्या एकाच अर्जावर कळवणच्या तहसीलदारांनी दोन वेगवेगळे निकाल देऊन तहसीलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. विशेष म्हणजे पहिल्या निकालात अर्ज मान्य केल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असतानाही पुढच्याच तारखेला त्याच प्रकरणात दुसरा निकाल देत थेट अर्जच फेटाळला आहे. तथापि, दुसर्‍यांदा निकाल फिरविण्यामागचे कारण काय असावे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

कळवण तालुक्यातील भेंडी येथील रहिवासी वसंत खंडू सोनवणे यांची मौजे निवाणे शिवारात स.नं.14/1, 14/3 व 15/3 च्या गट नं. 67 मध्ये वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या शेतजमीनीचे मूळ मालक भिवसन तुकाराम सोनवणे (धनगर) हे मयत झाल्यानंतर या मिळकतीवर त्यांच्या सात मुले व दोन मुली या वारसांपैकी केवळ थोरला मुलगा गणपत भिवसन सोनवणे यांच्या नावाची एकत्र कुटुंबकर्ता मॅनेजर अशी नोंद झाली.

त्यांनतर सर्व्हे नंबर जाऊन गटस्किम आली. या मिळकतीचे गटस्किममध्ये रूपांतर झाल्यानंतर गट नं. 67 च्या सातबारा उतार्‍यावर गणपत सोनवणे यांचे नाव लागले खरे; मात्र त्यांच्या नावापुढचा एकत्र कुटुंबकर्ता मॅनेजर हा उल्लेख गाळला गेला. त्यामुळे अन्य वारसांपुढे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. तथापि, कळवण तहसीलने आपली चूक सुधारून या गट नं.67 च्या सातबारा उतार्‍यावर एकत्र कुटुंबकर्ता मॅनेजर हा उल्लेख करून 2176 नुसार इतर वारसांची नोंद करावी, असा अर्ज वसंत सोनवणे यांनी केला केला होता.

यासाठी वसंत सोनवणे यांनी सर्व कागदपत्रेही कळवण तहसीलकडे सादर केली. या अर्जावर कळवण तहसीलने सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर तत्काळ निकालही दिला. अर्जदार यांचा अर्ज अंशत: मान्य करण्यात येत आहे, असा उल्लेखही यात करण्यात आला आहे. पंधरा दिवसानंतर सोनवणे यांच्या त्याच अर्जावर तहसीलने चक्‍क दुसरा निकाल पाठवून अर्ज फेटाळण्यात आल्याचे आदेशित केले आहे. या प्रकरणी दुसर्‍यांदा अर्जही केला नसताना कळवण तहसीलमधून आलेल्या आदेशाची प्रत वाचून अर्जदार वसंत सोनवणे मात्र चक्रावून गेले आहे. त्यांना एकाच प्रकरणात प्राप्त झालेले दोन वेगवेगळे निकाल आणि यात दुसर्‍यांदा झालेला बदल याबाबत पंचक्रोशीत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. 

दरम्यान, मुळात तहसीलदाराने एखाद्या प्रकरणात पहिल्यांदा दिलेला निकाल पुन्हा त्यालाच फिरवता अथवा बदलता येत नाही. महसूल संहितेप्रमाणे त्या निकालावर वादी वा प्रतिवादी यांना प्रांताधिकारी किंवा न्यायालयाकडे दाद मागता येते.