लासलगाव : वार्ताहर
जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत अटक केली. गोयंकास न्यायालयात हजर केले असता 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीच्या माध्यमातून लासलगाव परिसरात एजंटला मोठे कमिशन देऊन गुंतवणूक केलेल्या रकमेवर घसघशीत परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, कंपनीकडून विहित वेळेत परतावे मिळत नसल्याने कंपनीचा चेअरमन गोयंका व त्याच्या सहकार्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची पहिली तक्रार कविता पगार केली होती. लासलगाव येथील अनिल गवळी, विजय भोर, रूपेश पांडे, पंकज सुर्वे, संतोष जगताप, संतोष खाडे तसेच देवळा येथील दीपक पगार व डॉ. भूषण आहेर यांच्यासह इतर एजंटमार्फत अनेक ठेवीदारांनी रकमा गुंतवणूक केल्या. मात्र, परतावे मिळाले नसल्याने फसवणूक झाल्याचे समजले. सिट्रस कंपनीने लासलगावच्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मोठी गुंतवणूक करून स्वमालकीचे कार्यालय उभारले आहे.
पैसे परत मिळावेत यासाठी गुंतवणूकदारांनी कार्यालयात वारंवार चकरा मारल्या. परंतु रक्कम देण्यात टाळाटाळ केली जात होती. यामुळे फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी लासलगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार कंपनीचा चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्याच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, गोयंकाला पोलिसांनी अटक केलेली नव्हती. अखेर तक्रारींची वाढती संख्या आणि पाठपुराव्यामुळे गोयंकाला मुंबई येथून अटक केली आहे.