Wed, Jul 17, 2019 20:27होमपेज › Nashik › नाशिक महापालिकेत अडीचशे बदल्या

नाशिक महापालिकेत अडीचशे बदल्या

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:46AMनाशिक : प्रतिनिधी

आरोग्य विभागातून अन्य ठिकाणी सोयीनुसार बदली करून घेतलेल्या सुमारे 250 सफाई कर्मचार्‍यांना पुन्हा मूळ आरोग्य विभागात धाडून त्यांच्या हाती मनपा आयुक्‍तांनी सफाईचा झाडू ठेवला आहे. सफाईसाठी कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने विविध ठिकाणी सोयीनुसार बसलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याची मागणी प्रलंबित होती. काही विशिष्ट प्रभागात तर कर्मचार्‍यांचे कमी अधिक प्रमाण असल्याने त्याबाबतचाही मुद्दा आयुक्‍त निकाली काढणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

सध्या महापालिकेत आरोग्य विभागात 1965 इतके सफाई कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास 264 इतके कर्मचारी मनपा मुख्य इमारतीतील पदाधिकारी तसेच सहा विभागीय कार्यालयांतील पदाधिकार्‍याकंडे सोयीनुसार अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. परंतु, या कर्मचार्‍यांचा ताण इतर कर्मचार्‍यांवर पडत असून, सफाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने जवळपास 40 टक्के शहराची स्वच्छताच होत नसल्याचे आरोग्य विभागानेच स्पष्ट केलेले आहे. यामुळे संबंधित 264 कर्मचार्‍यांसह आणखी 700 कर्मचार्‍यांची मानधनावर भरती करण्यात यावी, अशी मागणी आणि ठरावही महासभेत करण्यात आले आहेत. परंतु, शासनाने मानधनावर भरतीस बंदी करून कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असे आदेश दिले आहेत.

यामुळे सध्या भरतीवरून पेच निर्माण झालेला आहे. यामुळे कर्मचारी आजही कमी आहेत. ही स्थिती पाहून सफाईसाठी पुरेसे कर्मचारी मिळावेत म्हणून आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी पदाधिकारी व इतरही विभागात गरज नसताना बसलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा आपल्या मूळ सेवेत आणून त्यांच्या हाती सफाईचा झाडू ठेवण्याचा निर्णय घेत त्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे आरोग्य विभागात सुमारे अडीचशे कर्मचारी स्वच्छतेसाठी उपलब्ध होणार आहेत.