Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Nashik › सव्वा वर्षाच्या कार्यकाळामुळे नव्या चेहर्‍यांना मिळणार संधी

सव्वा वर्षाच्या कार्यकाळामुळे नव्या चेहर्‍यांना मिळणार संधी

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:39PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेतील महापौर, उपमहापौर, गटनेता आणि सभागृह नेत्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होत असल्याने त्यांच्या जागी अन्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर पदाधिकार्‍यांची नियुक्‍ती करताना प्रत्येकाला सव्वा वर्षाचा कालावधी देणार असल्याचे सांगत संबंधितांकडून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामे लिहून घेतले होते. 

नाशिककरांनी 66 नगरसेवक निवडून देत भाजपाला एकहाती सत्ता दिली. यामुळे भाजपात मनपातील विविध पदांसाठी इच्छुकांचे मोहोळच तयार झाले होते. प्रत्येकाला वेगवेगळ्या पदांवर संधी मिळावी आणि कुणाची नाराजी ओढावली जाऊ नये यासाठी भाजपाने फंडा शोधून काढला होता. त्यानुसार महापौर, उपमहापौर, गटनेते आणि सभागृहनेता यांना सव्वा वर्षाचा कालावधी ठरविण्यात आला. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी रंजना भानसी यांना महापौर, प्रथमेश गिते यांना उपमहापौर तर गटनेतेपदी संभाजी मोरुस्कर आणि सभागृहनेतेपदी दिनकर पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली. ही नियुक्‍ती करताना पालकमंत्री महाजन यांनी संबंधितांकडून लगेच राजीनामेदेखील लिहून घेतले होते. आता या पदाधिकार्‍यांचा कालावधी संपण्यास काही दिवसच उरल्याने त्यांच्या जागी इतर नगरसेवकांची निवड करण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत.

त्यानुसार महापौरपदासाठी सुरेश खेताडे किंवा रूपाली निकुळे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच इतर पदांसाठी उद्धव निमसे, सतीश सोनवणे, दीपाली कुलकर्णी, दिनकर आढाव यांची नावे चर्चेत आहेत. निकुळे यांना महापौरपद मिळाले तर इंदिरानगर भागातील पहिल्या महापौर त्यांच्या रूपाने मिळतील. आजवर पंचवटी विभागातूनच बहुतांश पदांसाठी नियुक्‍ती झालेली आहे. त्यात महापौरपदासाठीच सर्वाधिक नगरसेवकांना संधी मिळाली आहे.