होमपेज › Nashik › उच्चशिक्षित चोरटे : आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

नाशिक : पंचवीस लाखांच्या चोरीच्या दुचाकी हस्तगत

Published On: Jun 29 2018 12:05AM | Last Updated: Jun 28 2018 11:20PMनाशिक : प्रतिनिधी

शहर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईतून चोरट्यांकडून नाशिकसह इतर जिल्हे आणि गुजरात राज्यातून चोरलेल्या 63 दुचाकी जप्‍त केल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सर्वाधिक 15 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेने चार संशयितांना अटक केली आहे.  

गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आकाश अशोक मराठे (रा. महाराणा प्रताप चौक, सिडको), उमेश ऊर्फ पप्पू युवराज मोरे (रा. धुळे), शरद भरत बुवा (रा. शिरपूर, जि. धुळे) आणि राहुल सुभाष वाघ (रा. शिंगावे गाव, जि. धुळे) अशी या संशयितांची नावे आहेत. चौघेही संशयित उच्चशिक्षित असून, कमी कालावधीत पैसे कमवण्याच्या लोभापायी ते दुचाकी चोरी आणि विक्री करत असल्याचे उघडकीस आले. आकाश आणि शरद या दोघांनीही डीएमएलटीचे शिक्षण घेतले आहे. तर उमेश याने अभियांत्रिकीचा डिप्लोमा केला, तर राहुल हा बीएसस्सीच्या दुसर्‍या वर्गात शिक्षण घेत आहे. 

या चौघांकडून आठ लाख 15 हजार रुपयांच्या 15 दुचाकी जप्‍त केल्या असून, भुसावळ येथील त्यांचा एक साथीदार फरार आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, हवालदार श्रीराम सपकाळ, रमेश घडवजे, श्यामराव भोसले, गुलाब सोनार, राजाराम वाघ, अन्सार सय्यद, पोलीस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली. या चोरट्यांकडून अंबड, देवळाली कॅम्प, आडगाव, मुंबई नाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दुचाकींसह चाळीसगाव, धुळे जिल्हा व गुजरातमधील चोरीच्या दुचाकी मिळाल्या आहेत.