Thu, Jun 27, 2019 01:52होमपेज › Nashik › वादग्रस्त ठेके अन् रस्तेही मुंढेंच्या तावडीत सापडणार 

वादग्रस्त ठेके अन् रस्तेही मुंढेंच्या तावडीत सापडणार 

Published On: Feb 08 2018 1:40AM | Last Updated: Feb 08 2018 1:34AMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्‍ती झाल्याने मागल्या दाराने मंजूर झालेल्या अनेक विषयांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यातील 257 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचा समावेश असून, मनपातील काही अधिकार्‍यांची रखडलेली चौकशी तसेच डस्टबिन खरेदीबरोबरच घंटागाडी, पेस्ट कंट्रोलचा वादग्रस्त ठेका आणि स्मार्ट लायटिंग याबाबत मुंढे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. शहरात अनधिकृत बांधकामे करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांच्या उरात मुंढे यांच्या नियुक्‍तीने धडकी भरली आहे. 

सोलापूर, जालना, नवी मुंबई, पुणे येथील त्यांची कारकीर्द पाहता नाशिक येथील पदभार घेण्यापूर्वीच अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून घंटागाडी व पेस्ट कंट्रोलच्या नावाखाली मनपाची आर्थिक लूट सुरू आहे. अटी-शर्तींचा भंग होऊनही अधिकार्‍यांनी संबंधित दोन्ही योजनांच्या ठेकेदारांना आजवर पाठीशी घालण्याचे काम केले आहे. गेल्या वर्षभरापासून 16 कोटींच्या पेस्ट कंट्रोल ठेक्याची चौकशी करण्याबाबत मागणी करूनही अधिकार्‍यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. मनपातील उद्यान, अतिक्रमण, नगररचना व अग्निशमन विभागात अनेक गैरप्रकार सर्रासपणे सुरू आहेत. त्यासंदर्भातील चौकशीबाबत सुरू असलेली कार्यवाही मध्येच थांबविण्यात आल्याने त्याबाबतही अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. संबंधित अधिकारी आजही उजळमाथ्याने फिरत आहेत. खत प्रकल्पातील सुमारे 60 कोटींच्या मशीनरी व वाहन खरेदीबाबतही संबंधित अधिकार्‍यास पाठीशी घातले गेले आहे. अलीकडेच झालेल्या 21 लाखांच्या डस्टबिन खरेदीबाबतही आरोग्य विभाग वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. यामुळे या चौकशीबाबतही आता नवनियुक्‍त आयुक्‍त मुंढे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. एलईडी आधीच्या वादग्रस्त ठेक्याबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. असे असताना शासनाकडून आलेल्या आदेशानुसार ईईएसएल या कंपनीकडून स्मार्ट लायटिंग बसविली जाणार आहे. वास्तविक या नवीन ठेक्यामुळे मनपा आर्थिक अडचणीत सापडू शकते. असे असताना शासनाच्या आग्रहाखातर मनपात पदाधिकार्‍यांकडून मनमर्जी सुरू आहे. 

257 कोटींचे रस्ते वादात

महासभेत मागल्या दाराने जादा विषयात 257 कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नवीन अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद केली जाणार असली तरी गैरमार्गाने आलेल्या या कोट्यवधींच्या कामांविषयीदेखील मुंढे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. याच रस्त्यांच्या कामांना सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आधी विरोध केला होता. मात्र, मनपा पदाधिकारी व अधिकार्‍यांनी अशी जादू केली की विरोधकांचाही विरोध मावळला.प्रहार, ‘आप’कडून स्वागत तुकाराम मुंढे यांच्या नियुक्‍तीचे प्रहार जनशक्‍ती पक्ष आणि आम आदमी पार्टीने स्वागत केले आहे. आता नाशिकमधील भ्रष्टाचाराला लगाम लागण्यास मदत होणार असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे. पुणे येथे मुंढे यांच्यावर आरोप करणार्‍यांचाही प्रहार व आपने निषेध नोंदविला.

बससेवेसाठीच मुंढेंना पाचारण 

दत्तक नाशिक घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरात बससेवा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवायचा आहे. त्यासाठी त्यांनी नाशिकमध्ये तशी घोषणा करत मनपाला कामाला लावले. मात्र, हा ‘पांढरा हत्ती’ महापालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडू शकतो का, याविषयी अनेक मतमतांतरे सुरू असल्याने तसेच 2019 पर्यंतच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागावे यासाठीच मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांना नाशिक येथे नियुक्‍ती दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. पुणे महानगर परिवहन समितीतील कामाचा अनुभव नाशिक येथे उपयोगी पडावा हा त्यामागील दृष्टिकोन असला तरी अभिषेक कृष्णा यांनाही याच पदाचा अनुभव आहे. मग कृष्णा यांची तडकाफडकी बदली करण्याचे कारण काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.