Mon, Mar 18, 2019 19:15होमपेज › Nashik › तुकारामांमुळे तरणार का नाशिकच्या विकासाची गाथा?

तुकारामांमुळे तरणार का नाशिकच्या विकासाची गाथा?

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 10 2018 11:20PMज्ञानेश्‍वर वाघ

तुकाराम मुंढे यांची सोलापूर, पुणे, नवी मुंबई यासह विविध ठिकाणी काम करण्याची शैली पाहिली तर लोकप्रतिनिधींशी त्यांचे अनेकदा खटके उडालेले आहेत. त्यांच्या या कार्यशैलीने ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. नागरी कामांना केंद्रबिंदू ठेवून काम करण्यास त्यांनी प्राधान्य दिलेले असल्याने जनतेच्या नजरेत आजमितीस ते सिंघम आहेत. आता त्यास ते कितपत खरे उतरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अर्थात, पहिल्याच दिवशी त्यांनी त्याची झलक प्रशासनातील अधिकार्‍यापासूनच दाखवून दिली आहे.

भाजपाची महापालिकेत एकहाती सत्ता असूनही सत्तारूढ पक्षातील काहींनी विरोधकांशी हातमिळवणी करत ‘मिले सूर मेरा तुम्हारा...’असाच कारभार सुरू आहे. यामुळे एक वर्षाचा भाजपाचा कारभार पाहता जनमतविरोधात घुसू लागले होते. याची जाणीव कदाचित विरोधकांबरोबर संधान साधणार्‍यांना झाली नसावी. मनपातील कारभारावरून विरोधी पक्षांशी खटके उडण्याऐवजी सत्तारूढ पक्षातील पदाधिकार्‍यांमध्येच फटाके फुटत असल्याने पक्षाची प्रतिमाही मलिन होत चालली होती. या सर्व प्रकारात मनपातील अधिकारी आणि कर्मचारी बेजार झाले होते. यामुळे या सगळ्या पार्श्‍वभूमीवर अखेर पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्रजींनाच हस्तक्षेप करून तुकाराम मुंढे नावाचे प्रस्थ महापालिकेत पाठवून बुडणारे जहाज वाचविण्याचा प्रयत्न करावा लागला आहे. यामुळे आता तरी नाशिककरांचा वनवास संपणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

मनपाच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शब्दावर विश्‍वास टाकून नाशिककरांनी मनसेच्या हाती सत्तेच्या चाव्या झोकल्या होत्या. अर्थात, नाशिककरांच्या अपेक्षा पूर्ण करताना मनसेला अपयशच पदरी आले. मनसेच्या काळात अनेक अडचणी आल्या असल्या तरी नागरिकांच्या दृष्टीने मनसेकडील सत्ता महत्त्वाची होती. यामुळे काही करून नाशिकला वेगळेपण हवे होते. ते देण्यात राज ठाकरे कमी पडले आणि त्याला बराच विलंबही झाला. यामुळे गेल्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर विश्‍वास ठेवून नाशिककरांनी महापालिका भाजपाच्या ताब्यात दिली. नुसती ताब्यातच दिली नाही तर गेल्या 25 वर्षांत एखाद्या पक्षाला जितके यश मिळाले नाही तेवढे भरभरून नाशिककरांनी आपली कृपादृष्टी भाजपावर टाकली. एकहाती सत्ता म्हटल्यावर तसे पाहिले तर कोणत्याही अडचणींचे कारण सांगण्याची गरजच नाही. परंतु, गेल्या 11 महिन्यांचा भाजपाचा कारभार पाहिला तर ‘दगडापेक्षा वीट मऊ’ अशी म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येऊन ठेपली आहे. बहुमतापेक्षा अधिक संख्या असलेल्या भाजपाची सध्याची अवस्था अगदी केविलवाणी झाली आहे. आपल्याच पक्षातील पदाधिकारी व नगरसेवकांशी वागताना काडीमोड आणि विरोधकांशी मात्र तडजोड केली जात असल्याने भाजपाचे अंतर्गत बरेच फाटले होते. महासभेतील अनेक विषयांवर संगनमत करूनच कारभार केला जात होता. म्हणजे थोडक्यात सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्‍यांना उघडउघड काही गोष्टी करता येत नसल्याने त्यांनी विरोधी पक्षातील पदाधिकार्‍यांना हाताशी धरून महासभेत गोंधळ घालून वादग्रस्त विषय मंजूर करण्याचा सपाटा लावला होता. पाणी इतके डोक्यावरून गेले की या सर्व प्रकारांची शंभरी भरल्याने वरिष्ठांना हस्तक्षेप करावा लागला. त्यासाठी दोेन ते तीन वेळा ताकीदही देऊन झाली. मुख्यमंत्र्यांनी तर वर्षा बंगल्यावर सर्वांना बोलावून खरडपट्टी काढत कारभार्‍यांना कारभार सुधारण्याची संधी दिली होती. परंतु, हेच पदाधिकारी त्यानंतरही इतके उजळमाथ्याने फिरत होते की जणू काही झालेच नाही. विरोधकांशी जुळवून घेण्यापर्यंत ठिकठाक. परंतु, त्याचा त्रास अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही होऊ लागल्याने कामकाजाचा गाडा थांबला होता. दबावामुळे अधिकारी मेटाकुटीला आले होते. हा सर्व प्रकार माहिती असूनही तत्कालीन आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी योग्य प्रकारे लक्ष दिले नाही. यामुळे अधिकारीही या सर्व प्रेशरखाली कामकाज करत होते.

या सर्व बाबी शहरातील भाजपाची धुरा हाती असणार्‍या प्रमुखापर्यंत जाऊनही त्यांनी मात्र ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ हीच भूमिका ठेवल्याने प्रकरण हाताबाहेर गेले होते. यामुळे कारभार आत्ताच सुधारला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत काही खरे नाही हे भविष्य स्पष्ट दिसू लागल्याने सरतेशेवटी पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकार्‍यांना वळण लावण्यासाठी आणि अधिकार्‍यांवरील बर्डन कमी करण्याच्या दृष्टीने तुकाराम मुंढे यांना पाचारण करावे लागले आहे. तशी कबुली खुद्द मुंढे यांनीदेखील दिली आहे. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी असलेली बससेवा, आयटी आणि स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचेही आयुक्‍तांनी स्पष्ट केल्याने येत्या वर्षभरात नाशिकमधील अनेक योजना मार्गी लागलेल्या नाशिककरांच्या नजरेस पडतील असे म्हणावयास तूर्तास हरकत नाही. प्रकल्प पूर्ण करतानाच शहरवासीयांच्या अनेक अपेक्षाही तुकाराम मुंढे या नावाच्या वलयामुळे उंचावल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करताना मुंढे आणि त्यांच्या सहकार्‍यांची दमछाक होणार आहे. यामुळे आगामी काळ खरे तर महापालिका प्रशासनासाठी आव्हानच ठरणार आहे. कारण याआधीचे अनेक प्रकारचे साचलेले डबके स्वच्छ करण्याची तारेवरची कसरत करायची आहे. गोदावरी व उपनद्यांचे प्रदूषण, जुने नाशिक व पंचवटी गावठाणसाठी क्‍लस्टर डेव्हलपमेंट, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मलवाहिका व मलजलशुद्धीकरण केंद्रांचे अद्ययावतीकरण, उद्याने, घंटागाडी योजना यासह विविध कामांमध्ये बारकावे आणून या गोष्टी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आयुक्‍तांच्या खांद्यावर असणार आहे. 

तुकाराम मुंढे यांची सोलापूर, पुणे, नवी मुंबई यासह विविध ठिकाणी काम करण्याची शैली पाहिली तर लोकप्रतिनिधींशी त्यांचे अनेकदा खटके उडालेले आहेत. त्यांच्या या कार्यशैलीने ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. नागरी कामांना केंद्रबिंदू ठेवून काम करण्यास त्यांनी प्राधान्य दिलेले असल्याने जनतेच्या नजरेत आजमितीस ते सिंघम आहेत. आता त्यास ते कितपत  खरे उतरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
अर्थात, पहिल्याच दिवशी त्यांनी त्याची झलक प्रशासनातील अधिकार्‍यापासूनच दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्यांची जबाबदारी व अधिकार ओळखूनच आपापले काम करण्याचा सल्लाही देत एकमेकांच्या कामकाजात लुडबुड न करण्याचा सल्ला देऊ केला आहे. मुख्यमंत्र्यांनीच मुंढे यांची खास नियुक्‍ती केलेली असल्याने भाजपातील मंडळी उघडउघड विरोध करणार नाही. परंतु, विरोधकांच्या मदतीने कुरापती करण्याची शक्यता आहे. यामुळे मुंढे त्यास कसे तोंड देणार असा प्रश्‍न आहे. कारण महासभेत मागल्या दाराने आणि जादा विषयातून अनेक प्रस्ताव दाखल होणार्‍या प्रकारांना आळा बसणार आहे. 
तर दुसरीकडे प्राकलन दरापेक्षा अत्यंत कमी दराने होणार्‍या कामांनाही खीळ बसणार असल्याने प्रशासनाविरोधात काही ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन उचापती करण्याची शक्यताच अधिक असल्याने आगामी काळात मनपाचा कारभार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.