होमपेज › Nashik › तुकाराम मुंढे नवे आयुक्‍त

तुकाराम मुंढे नवे आयुक्‍त

Published On: Feb 08 2018 1:40AM | Last Updated: Feb 08 2018 1:39AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक महापालिकेचे आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांची शासनाने बुधवारी (दि.7) तडकाफडकी बदली केल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. कृष्णा यांच्या जागी पुणे महानगर परिवहन समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्‍ती झाली असून, कृष्णा यांच्याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सोपविण्यात आलाआहे. मुंढे आज रुजू होण्याची शक्यता आहे.

आयुक्‍त कृष्णा हे नाशिकला येण्यापूर्वी पुणे महानगर परिवहन समितीचे अध्यक्ष होते. 7 जुलै 2016 रोजी त्यांनी नाशिक मनपा आयुक्‍तपदाचा कारभार हाती घेतला होता. अवघ्या 19 महिन्यांतच त्यांची बदली झाल्याने त्याविषयी खुद्द कृष्णा यांनीही नाराजी दर्शविली. त्यांच्या बदलीचे कारण काय, याविषयीच चर्चा रंगली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी  आयुक्‍तांना दूरध्वनी करत सहानुभूती दाखविली, तर आमदार तथा भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी महापालिकेत येऊन आयुक्‍तांची भेट घेतली. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आयुक्‍तांच्या बदलीची चर्चा सुरू होती. परंतु, बदलीसारखे कोणतेही कारण नसल्याने त्यांच्या बदलीबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. सत्तारूढ भाजपातील काही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महिन्यापूर्वी मनपातील कारभाराविषयी तक्रारी केल्या होत्या. मनपाचे कामकाज तसेच बैठकांना ठराविक आमदारांनाच बोलविले जात असल्याची ती तक्रार होती. तर दुसरीकडे 2019 मध्ये होणार्‍या निवडणुकांच्या दृष्टीने थेट मुख्यमंत्र्यांकडूनच या बदल्यांचे वारे फिरविण्यात आल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मनपा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहराला दत्तक म्हणून घेतल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्‍वभूमीवरच ही बदली झाली असावी, असेही बोलले जात आहे. 

कृष्णा यांची मनपातील कारकीर्द

नाशिक मनपा आयुक्‍तपदाचा पदभार घेतल्यानंतर अभिषेक कृष्णा यांनी अनेक महत्त्वाची कामे केली. सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजार त्यांनी हटविण्याचे धाडस दाखविले. ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. गेल्या 20 वर्षांपासून या प्रकरणी एकाही आयुक्‍ताने हे धाडस दाखविले नव्हते. त्याचबरोबर खत प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक विकास आराखडा, अनधिकृत कपाट प्रकरणी नऊ मीटर रोडवरील इमारत नियमित करण्याबाबतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मालमत्ता सर्वेक्षण आणि शहरातील वृक्ष गणनाही कृष्णा यांच्या कार्यकाळातच मार्गी लागली. सुमारे 67 हजार इतक्या नवीन मालमत्ता सर्वेक्षणात आढळून आल्याने मनपाला सुमारे 15 कोटींचा महसूल प्राप्‍त होणार आहे. वॉटर ऑडिटसारखा रखडलेला प्रश्‍नही त्यांनी धसास लावला. मुकणे धरण पाणीपुरवठा योजना, पिंपळगाव खांब व गंगापूर गाव येथील मलजलशुद्धीकरण केंद्राचे कामही त्यांच्याच कारकिर्दीत मार्गी लागले.

मुंढे यांचा घेतला धसका 

कृष्णा यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने त्यांच्या निवडीचा नगरसेवकांसह अधिकारी व कर्मचार्‍यांनी धसका घेतला आहे. सोलापूर व जालना येथे जिल्हाधिकारी व नवी मुंबई मनपा आयुक्‍तपदी असताना त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. कर्तव्यदक्ष व कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. मुंबई सहविक्रीकर आयुक्‍त आणि त्यानंतर पुणे महानगर परिवहन समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली असून, परिवहनमधील 156 बसचालकांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याचे प्रकरणही गाजले होते. पुणे महापालिकेच्या महापौर मुक्‍ता टिळक आणि मुंढे यांच्यात वादही रंगला होता. त्यांची ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता नाशिक मनपातील अधिकारी व लोकप्रतिनिधीही धास्तावले आहेत.