Tue, Jul 23, 2019 04:02होमपेज › Nashik › संत साहित्याचे अध्ययन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील :  मुख्यमंत्री फडणवीस 

संत साहित्याचे अध्ययन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील :  मुख्यमंत्री फडणवीस 

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 12:39AMनाशिक : प्रतिनिधी

संस्कृतीचा खरा इतिहास विदर्भ भूमीत आहे. सदाचार व सद्वर्तनाचे काम संत साहित्याने केले आहे. सर्व तत्त्वज्ञानाला एकत्र करून राष्ट्राचा विकास होण्यासाठी संतांचे योगदान महत्त्वाचे आहे. संतपीठ तसेच संत साहित्याचे प्रत्येक विद्यापीठात अध्ययन केंद्र सुरू झाले पाहिजे. संत साहित्याचा मूल्य शिक्षणामध्ये समावेश करण्यासाठी संंमेलनाध्यक्ष डॉॅ. रामकृष्ण लहवितकर महाराजांंनी केलेली संतपीठाची मागणी आपण मान्य करीत असून, त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्यातर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षपदी संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे होते. व्यासपीठावर पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार परिणय फुके, आमदार संजय पुराम, समाजकल्याणचे सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्‍त मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवनीकर, प्रशांत महाराज ठाकरे, महादेवबुवा शहाबाजकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, संत हे कर्माने व ज्ञानाने महान पदावर विराजमान झाले. त्यामुळे समाजातील सर्व लोक संतांपुढे नतमस्तक होतात. 11 ते 17 व्या शतकापर्यंत आपल्या संस्कृतीवर आक्रमण होत होते, हे आक्रमण परतवून लावण्याचे काम संतांनी केले. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही. लोकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम संतांनी केले. वारकरी संप्रदाय हे जगातील अद्वितीय संघटन आहे. आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. 

संमेलनाध्यक्ष डॉॅ. लहवितकर म्हणाले, सदाचार व सद्वर्तनाचे काम संत साहित्याने केले आहे. सर्व तत्त्वज्ञानाला एकत्र करून समग्र राष्ट्राचा अभ्युदय व्हावा, यासाठी संतांचे योगदान महत्त्वाचे आहे. धर्म व संस्कृतीला मानणारे शासन राज्याला लाभले आहे. आज संत विचारांची गरज आहे. प्रत्येक विद्यापीठांत संत साहित्याचे अध्ययन केंद्र सुरू झाले पाहिजे. संत साहित्याचा मूल्य शिक्षणामध्ये समावेश केला पाहिजे. प्रास्ताविक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले. रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. बार्टीचे महासंचालक कैलाश कणसे  यांनी आभार मानले.