Mon, Jul 13, 2020 22:17



होमपेज › Nashik › टेम्पो व रिक्षाला ट्रक धडकला

टेम्पो व रिक्षाला ट्रक धडकला

Published On: Jun 13 2019 1:35AM | Last Updated: Jun 13 2019 1:35AM




धुळे : प्रतिनिधी

मालेगावहून धुळ्याकडे भरधाव जाणार्‍या ट्रकचालकाचा ताबा सुटून ट्रक थेट विरुद्ध बाजूने धुळ्याहून मालेगावकडे जाणार्‍या टेम्पो व रिक्षाला धडकला. त्यात चार जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये मालेगावच्या तिघांचा समावेश असून, एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे शहरानजीकच्या लळिंग घाटात दुपारी हा भयंकर अपघात झाला. 

याबाबत माहिती अशी की, धुळे शहर आणि परिसरात दुधाचे वाटप करून एमएच 17 बीडी 5269 या क्रमांकाच्या गोदावरी दुधाचा टेम्पो मालेगाव शहराच्या दिशेने जात होता. या टेम्पोचालकाने काही प्रवाशांना मागील बाजूस बसवले होते. या गाडीपाठोपाठ प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा (एमएच 18 बीए 2192) जात होती. या रिक्षात धुळे तालुक्यातील आर्वी गावातील प्रवासी बसले होते. दोन्ही वाहने लांडोर बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचली. यावेळी मालेगावहून धुळ्याकडे जाणार्‍या भरधाव ट्रकचालकाचा (क्रमांक एमएच 18 बीए 2192) गाडीवरील ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या चौपदरीकरणाचा दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला आला.

हा ट्रक गोदावरी दूध वाहतूक करणार्‍या टेम्पोवर आदळल्याने गाडीचा पत्रा कापला गेला. टेम्पोला धडक बसल्यानंतर त्या पाठोपाठ जाणार्‍या रिक्षालाही ट्रकने धडक देऊन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन आदळला. या भीषण अपघातात दूध गाडीच्या मागील बाजूचा चक्काचूर झाल्याने दूध गाडीत बसलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये अलिया जाकीर अली (7), नौशादबी हमीद अली (40), हमीद अली साहेब अली (45, सर्व रा. मालेगाव, हल्ली मुक्काम सुरत) व एका 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा समावेश आहे. अली कुुटुंब धुळे शहरात नातेवाइकांना भेटण्यासाठी जात असल्याची माहिती पोलीस पथकाने दिली. या अपघातात ट्रकचालक शौकतखान करीमखान पठाण, विक्की नंदलाल ठाकरे, अतुल चैत्राम पाटील जखमी झाले.