Thu, Jul 18, 2019 10:52होमपेज › Nashik › रसायन वाहतूक करणारा ट्रक पेटला

रसायन वाहतूक करणारा ट्रक पेटला

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 11:04PMपेठ : वार्ताहर 

ज्वलनशील असलेले रसायनाचे ड्रम घेऊन गुजरातमधून नाशिकडे जाणार्‍या मालवाहू ट्रकने पेठ शहरात महामार्गावर अचानक पेट घेतला. रसायनाने प्रचंड पेट घेतल्याने ड्रम फुटून स्फोट होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांची भीतीने पाचावर धारण बसली होती. चालकांने त्याच स्थितीत पेटता ट्रक निर्जनस्थळी नेेऊन उभा केला. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. आगीत ट्रकमात्र जळून खाक झाला होता.

रात्री उशिरापर्यंत या ट्रकमध्ये भरलेल्या ज्वलनशील रसायन भरलेल्या ड्रमचे स्फोट सुरू होते. यात ट्रक पूर्णपणे बेचिराख झाला असून चालक व वाहकाच्या धैर्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. गुजरात राज्यातून नाशिकच्या दिशेने जाताना जी.जे.01- ए.टी. 9372 हा मालवाहू ट्रक पेठ शहरातून जात असताना   अचानक पेटला. ही घटना नागरिकांनी चालक आणि वाहकाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे ऐन शहरातून ट्रक निर्जनस्थळी नेण्यासाठी चालकाने जीवाची बाजी लावली. शहरातून काही अंतरावर गेल्यानंतर चालक आणि वाहकाने ट्रकमधून उड्या मारल्या. त्यानंतर ट्रकला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले. रसायनाचे ड्रम फुटत असल्याने त्याचा स्फोटकासारखा आवाज येत होता. पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माार्गावर दोन्ही बाजूची रहदारी थांबविली. निरीक्षक दिलीप भागवत घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करत होते.  शहरात व जवळपास कुठेच अग्नीशमन यंत्रणा दूरदूर नसल्याने हा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला.