होमपेज › Nashik › प्लास्टिकमुक्त अन् निर्मळ यात्रोत्सव पार पाडा : पाटील

प्लास्टिकमुक्त अन् निर्मळ यात्रोत्सव पार पाडा : पाटील

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:40PM

बुकमार्क करा
त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

12 जानेवारीला संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्‍वर येथे दाखल होणार आहेत. त्यामुळे गर्दीचे नियोजन करून भाविकांना सुख-सुविधा उपलब्ध करून देत यंदाची यात्रा प्लास्टिकमुक्त अन् पार पाडण्याचे आवाहन प्रांत अधिकारी राहुल पाटील यांनी केले.

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर येथील तहसील कार्यालयात पार पडललेल्या बैठकीत प्रांताधिकारी पाटील बोलत होते.भाविकांना नगरपालिकेने शहरात व वनविभागाने फेरी सुरू होणार्‍या वनविभागात कापडी किंवा कागदी पिशव्या उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभी करण्याची सूचनाही पाटील यांनी केली.

यावेळी शासनाच्या विविध सेवा देणार्‍या वीज, आरोग्य, वाहतूक, पोलीस, बांधकाम,अन्न व प्रशासन, नगरपालिका या यंत्रणांच्या तयारीबाबतच आढावा घेण्यात आला. तहसीलदार महेंद्र पवार, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, संत निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. भागवत लोंढे यांनी यात्रा काळात भाविकांसाठी असलेला आरोग्य विभागाचा आराखडा सादर केला. तसेच ,परिवहन विभागाने होणार्‍या गर्दीची दखल घेत 300 गाड्यांची तरतूद केली. जव्हार फाटा या ठिकाणी गाड्याची पार्किंग होणार असल्याची माहिती दिली. यावेळी महामंडळाने वाहतुकीसोबतच स्वच्छतेकडे लक्ष देऊन भाविकाच्या आरोग्याची काळजी घेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली. अन्न व औेषध प्रशासनाच्या वतीने आलेल्या कर्मचार्‍यास गैरहजर असल्याने प्रांताधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, नगरसेवक समीर पाटणकर व सागर उजे यांनी नाशिक-त्र्यंबक मार्गावरील यात्रा काळात तीन दिवस दारू विक्रीसह मटन मार्केट बंद करण्याची मागणी केली. तमाशाच्या फडास परवानगी न देण्याचे पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सूचविले. यावेळी पवन भुतडा, शांताराम बागूल, रवींद्र सोनावणे, सर्व नगरसेवक उपस्थित होते.