Sun, May 26, 2019 01:28होमपेज › Nashik › आईच्या कुशीतून हिसकावून बालकाचा नरबळीचा प्रयत्न

धक्कादायक; नाशिकमध्ये नरबळीचा प्रयत्न

Published On: May 04 2018 5:36PM | Last Updated: May 04 2018 6:08PMत्र्यंबकेश्वर : वार्ताहर

झारवड बु ग्रामपंचायतीच्या हद्दीत दापुरेपैकी पाचकुंडल्याच्या वाडीत अंधश्रद्धेपोटी बालकाचा नरबळी देण्याची तयारी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. वाडीपासून काही अंतरावर असलेल्या जंगलात काही दगडावर कर्मकांड केल्‍याचे तेथील साहित्‍यावरून दिसून आले असून त्याच ठिकानी एक बालक सापडल्‍याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून येथे काही अघोरी कृत्य होणार होत का? असा संशय श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात नरबळी देण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, गुरूवारी मध्यरात्री मंगला चौधरी या मातेच्या कुशीत झोपी गेलेले चार महिन्याचे बालक अचानक गायब झाले. पहाटे मंगला हिला जाग आली असता, तिला आपले मुल शेजारी नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी घराच्या लोकांनी बालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. या घरातील लोकांच्या गोंधळावरून शेजारच्या लोकांनाही सदर घटनेची माहिती मिळाली असता, लोकांनीही बालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. याबाबतची माहिती संबंधीत कुटुंबाकडून पोलिस स्‍टेशनमध्ये कळवण्यात आली.

दरम्‍यान सकाळी पाचकुंडल्याच्या वाडीजवळ असलेल्या जंगलात बालक बेशुद्धावस्थेत आढळून आले. या ठिकाणीच काही अंतरावर कोंबडीचे पिल्लू,नारळ,वाटी एक पुजलेला दगड, लिंबू,खारीक,सुपारी,बदाम,एक रूपया आदी वस्तूही दिसून आल्‍या. यामुळे येथे अघोरी कृत्‍य होणार होते का तसेच या कृत्‍यात या निष्‍पाप बालकाचा नरबळी दिला जाणार असल्‍याचा संशय लोकांमधुन व्यक्‍त होत आहे. 

या घटना स्‍थळावरील साहित्‍यावरून येथे नरबळी देण्यासाठी तयारी होती का अशी शक्‍यता व्यक्‍त होत असून, पोलिसांनी या घटनेचा  तपास करून या घटनेतील सहभागींवर त्‍वरीत कारवाई करावी अशी मागणी स्‍थानिकांतुन होत आहे.