Sun, Apr 21, 2019 02:30होमपेज › Nashik › घनकचरा व्यवस्थापनासाठी त्र्यंबक  पालिकेला एक कोटी

घनकचरा व्यवस्थापनासाठी त्र्यंबक  पालिकेला एक कोटी

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:55PMत्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर 

त्र्यंबकेश्‍वर येथील घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपालिकेला एक कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्यास मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. या बैठकीस त्र्यंबकेश्‍वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष पप्पू शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन आराखड्याचे सादरीकरण मंगळवारी करण्यात आले. मात्र, प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन आराखडे मंजूर झाले असून, याबाबत नगरविकास विभागाकडे अहवाल सादर करणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे यांनी सांगितले. शहरात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविली जात असून, स्वच्छ सर्वेक्षणामध्ये त्र्यंबकेश्‍वर राज्यात 17 व्या क्रमांकावर आहे. स्वच्छता मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याचे प्रमाण 90 टक्के असून, त्यात वाढ होऊन त्याचे प्रमाण किमान 100 टक्के इतके यापुढे करण्यात येणार आहे. कचरा वर्गीकरणाचे  प्रमाण वाढविण्यात येण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही डॉ. केरुरे म्हणाल्या.

त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीसाठी आराखड्यास शासन स्तरावरून मंजुरी मिळण्यासाठी टीम वर्क कामी आले आहे. यातून पुढील 20 वर्षांचे नियोजन करून कचरा व्यवस्थापनाची काळजी घेण्यात येणार आहे. मिळालेल्या निधीतून घंटागाड्या, जेसीबी खरेदी करणे, बायोगॅसचे प्रमाण 4 मेट्रिक टनपर्यंत नेण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे असून, जनजागृती करण्यावर भर देण्यात येईल.
- डॉ. चेतना केरुरे-मानुरे, मुख्याधिकारी

ओला व सुका कचरा वेगळा करण्याची निकड प्रकर्षाने लक्षात आली आहे. ओला आणि कोरड्या कचर्‍याचे घरच्या घरीच योग्य व्यवस्थापन झाले तरच कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येईल. शासन स्तरावरून मिळालेल्या निधीची योग्य विनियोग यातून करून शहरात घनकचरा व्यवस्थापन करून राज्यात स्वच्छ शहर म्हणून नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
- पुरुषोत्तम लोहगावकर, नगराध्यक्ष 

ओला कचरा, पालापाचोळा, भाजीपाल्याचा कचरा, फळ-फुलांचा कचरा, लाकडाचा भुसा, नखे, केस, खरकटे अन्न, हाडे, मांस, माशांचे काटे, नारळ, शहाळे, करवंट्या, कोरडा कागद, पुठ्ठा, प्लास्टिक, धातू, कापड, चिंध्या, रेग्झिन, थर्माकोल, रबर, काच, ई-कचरा यांचे योग्य विघटन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करण्यावर भर देणार आहे. त्यासोबत घातक कचरा असलेल्या सुया, सिरिंज, जुनी औषधे, इंजेक्शनच्या न उकळलेल्या सुया, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, औषध-उपचारांसाठी वापरलेला कापूस, बॅटरी सेल्स, रंग, रसायने, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइटस्, कीटकनाशके, जंतुनाशके हा विषारी कचरा वेगळा ठेवण्यासह स्वच्छ शहर ठेवण्यावर भर देण्यात येईल.
- स्वप्निल शेलार, उपनगराध्यक्ष 

कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून होणार आहे. वस्तू वाया घालवण्याचे प्रमाण कमी करणे, सवयी बदलणे, हाताला वळण लावणे, स्वतःला शिस्त लावणे, सार्वजनिक स्वच्छतेची मूल्ये जपणे. वस्तूंचा वापर कमी करत चाळीस मायक्रॉनखालील प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे, वस्तूंची वेष्टने कमी करणे यावर भर देऊ. 
- समीर पाटणकर, गटनेता

त्र्यंबकेश्‍वर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते गजानन महाराज संस्थान येथील गटार कधीही स्वच्छ होत नाही. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. हॉटेलचालकांनी कचराकुड्यांमध्ये कचरा टाकावा. मात्र, तसे होत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गावात फवारणी होत नसल्याने रोगराई वाढत आहे. नगरपालिकेने या बाबीकडेही गांभीर्याने पहावे.
- नाना लहांगे, ग्रामस्थ