होमपेज › Nashik › आदिवासी भागांत होणार  ६६ नवीन अंगणवाड्या

आदिवासी भागांत होणार  ६६ नवीन अंगणवाड्या

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 12:40AMनाशिक : प्रतिनिधी

आदिवासी भागात 66 नवीन अंगणवाड्यांना इमारती बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. जवळपास चार कोटी 33 लाख 60 रुपये या इमारतींच्या बांधकामासाठी खर्च होणार आहेत.

सभापती अपर्णा खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज झाले. उघड्यावर भरणार्‍या अंगणवाड्यांचा मुद्दा यावेळी चर्चेत आला. त्यावेळी त्र्यंबकेश्‍वर-2, सुरगाणा-22, इगतपुरी-26, कळवण-4, दिंडोरी-1, नाशिक-6, बागलाण-5 अशा एकूण 66 अंगणवाड्यांना इमारतीच नसल्याने बालकांना उघड्यावर बसूनच ज्ञानार्जन करावे लागत आहे. आता या सगळ्याच अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती मिळणार आहेत.

खोसकर यांनी शुक्रवारी दिंडोरी तालुक्यातील काही अंगणवाड्यांना भेटी दिल्या असता सेविका स्थानिक पातळीवर वास्तव्यास राहत नसल्याचे समोर आले. तर पोषण आहाराचा पुरवठा होण्याबाबतही शंका उपस्थित करण्यात आली होती. सभेत यावर चर्चा झाल्यानंतर कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. योजनांचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करण्याचे आदेश देण्यात आले. निधी अखर्चित राहिल्यास वैयक्तिक जबाबदारी निश्‍चित करण्यात येईल, असेही प्रकल्प अधिकार्‍यांना ठणकावून सांगण्यात आले.