Mon, Jun 17, 2019 04:09होमपेज › Nashik › वाहतूकदार संपाने जिल्ह्यात १० कोटींची उलाढाल ठप्प

वाहतूकदार संपाने जिल्ह्यात १० कोटींची उलाढाल ठप्प

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 1:10AMनाशिक : प्रतिनिधी

वाढती इंधन दरवाढ, अवाजवी टोल आकारणी व अन्य बाबींविरोधात मालवाहतूकदारांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेला देशव्यापी संप मिटण्याची अद्यापही चिन्हे नाहीत. या संपामुळे शहर परिसरात सुमारे 5 हजार ट्रकची चाके ठप्प असून, त्यामुळे उद्योग क्षेत्रातील सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे. 

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनने मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या शुक्रवारपासून (दि. 20) संप पुकारला आहे. त्यामुळे शहर परिसरातून औषध, दूध, भाजीपाल्याची वाहतूक करणारे 5 हजार ट्रक थांबले आहेत. संबंधित ट्रकचालकांची आडगाव ट्रक टर्मिनस येथे चहा-नास्ता व भोजनाची व्यवस्था ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे. संपावर तोडगा निघेपर्यंत वाहतूक सुरू न करण्याचा निर्धार करण्यात आला असून, त्यामुळे उद्योगांना कच्चा माल उपलब्ध होऊ शकलेला नाही. परिणामी, जिल्ह्यातील दहा कोटी रुपयांची उलाढाल थंडावल्याचा दावा केला जात आहे.