Fri, Jul 19, 2019 00:57होमपेज › Nashik › गंगापूर धरण परिसरात पर्यटकांना ‘नो एंट्री’

गंगापूर धरण परिसरात पर्यटकांना ‘नो एंट्री’

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 20 2018 10:50PMनाशिक : प्रतिनिधी

निनावी फोनवरून गंगापूर धरण उडवण्याची दिलेली धमकी, तसेच धरण परिसरात पर्यटकांसह मद्यपींचा वाढलेला वावर यामुळे ग्रामीण पोलिसांनी धरणाची सुरक्षा वाढवली आहे. तसेच धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. धरण परिसराच्या ठिकठिकाणी पोलीस व पाटबंधारे विभागाच्या वतीने सूचनाफलक लावण्यात आले आहेत.

गंगापूर धरण हे नेहमीच पर्यटकांना आकषित करत असते. त्यामुळे येथे पावसाळ्यात पर्यटकांची वर्दळ वाढलेली असते. धरणावर फोटो काढण्यासोबतच काही टवाळखोर तेथेच मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असतात. त्यामुळे त्यांच्यासह धरणाची सुरक्षितता धोक्यात येते. काही दिवसांपूर्वीच नाशिक तालुका पोलिसांना निनावी फोनवरून गंगापूर धरणात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. त्यामुळेही पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांनी संपूर्ण धरणाची तपासणी केली होती. त्यानंतर पाटबंधारे खाते व पोलीस प्रशासनाने धरण परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घातली असून, हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. धरणाच्या संपूर्ण परिसरात जलसंपदा विभाग आणि पोलिसांव्यतिरिक्‍तइतर कोणालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. यामुळे या भागात युवावर्गाने येऊ नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. गंगापूर धरणाच्या परिसरात फिरताना आढळणार्‍यांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येत आहे. धरण परिसरात वारंवार युवक बुडण्याच्या घडणार्‍या दुर्घटनांनाही आळा घालण्यासाठी संयुक्‍तरीत्या कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.