Tue, Jun 18, 2019 21:09होमपेज › Nashik › शहीद योगेश भदाणे यांच्या जन्मगावी शोककळा

शहीद योगेश भदाणे यांच्या जन्मगावी शोककळा

Published On: Jan 14 2018 8:23PM | Last Updated: Jan 14 2018 8:23PM

बुकमार्क करा
धुळे : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शहीद जवान योगेश भदाणे यांच्या बलिदानामधून हजारो योगेश तयार होतील आणि पाकिस्तानच्या भ्याडपणाला सडेतोड उत्तर देऊन नायनाट करतील, अशी प्रतिक्रिया खलाणे गावातील प्रत्येकाच्या तोंडून व्यक्त झाली. जवान योगेश भदाणे शहीद झाल्याची माहिती शनिवारी कळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. तर गावातील नागरिकांनी भदाणे यांच्या श्याम शांती सदनाबाहेर दर्शनासाठी गर्दी केली आहे. पार्थिव जम्मूवरून येणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वजण जडअंतःकरणाने वाट पाहत असल्याचे चित्र दिवसभर खलाणे गावात होते.

शहीद योगेश भदाणे यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेतील चिमुरड्यांनी गावात आणि अंत्यसंस्काराच्या स्थळाची सफाई करण्यास सुरुवात केली. तर शहीद योगेशच्या परिवाराला धीर देण्यासाठी आलेल्या पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनादेखील आपले आश्रू आवरता आले नाही. शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील योगेश भदाणे हे जवान पाकिस्तानच्या  सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्याचे कळाल्याने योगेश यांच्या सदनाबाहेर गावकर्‍यांची गर्दी झाली आहे. आई मंदाबाई यांनी हंबरडा फोडल्याने या माउलीचा विलाप पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. तर वडील मुरलीधर भदाणे यांच्या डोळ्यात एकुलता एक मुलगा जाण्याचे दु:ख स्पष्टपणे दिसत होते. गावकरी रात्रभरापासूनच घराच्या अंगणात बसून आहेत. शहीद योगेश भदाणे हे  गावातील स्वामी विवेकानंद हायस्कूलचे विद्यार्थी होते. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांनी भदाणे यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यांची सफाई केली. गावालगतच मैदानावर शहीद योगेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने या मैदानाचे सपाटीकरण आणि चबुतर्‍याचे बांधकाम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात विद्यार्थीदेखील हातभार लावत आहेत. काम करत असतानाच विद्यार्थ्यांचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. पण, अशाही स्थितीत पाकिस्तानबरोबर दोन हात करण्याची तयारी या चिमुकल्यांनी बोलून दाखविली आहे. 

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला. योगेश भदाणे हे शहीद झाल्याने धुळे जिल्ह्यातील खलाणे गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. वयाच्या 28 व्या वर्षी देशसेवेबरोबरच माता आणि पित्याची सेवा करणार्‍या योगेश यांना वीरमरण आले. पाकिस्तान हा विकृत देश आहे. देशसेवा करणार्‍या योगेश यांच्या पाठीवर गोळी मारून त्यांनी भ्याडपणाचे लक्षण दाखविले आहे. आमच्या मातीमधील या वीराच्या बलिदानामधून हजारो लाखो योगेश उभे राहतील आणि पाकिस्तानला धडा शिकवतील, अशी भावना यावेळी त्यांनी ना. रावल यांनी व्यक्त केली. शहीद योगेश यांचे काका सुभाष भदाणे यांनी देखील योगेश यांच्या बलिदानातून शुरांची सेना निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच योगेश याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सैन्यदलात प्रवेश केला. बालपणापासूनच त्याच्या तोंडून भारतमातेच्या रक्षणाची आवड दिसून येत होती. आज तो देशाच्या कामी आल्याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. तर शहीद योगेश यांचा मित्र खुशाल पवार याने शाळेतील आठवणींना उजाळा दिला. स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एच. पाटील यांनीदेखील योगेशचे बलिदान वाया जाणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पार्थिव उशिरा दाखल होणार
खलाणे येथे शहीद योगेश भदाणे यांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्याचा आढावा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी घेतला असून, पार्थिव जम्मू येथून विमानाने रात्री उशिरापर्यंत दाखल होणार असल्याचे ना. रावल यांनी सांगितले आहे. 

खलाणे येथील 14 जवान सैन्यात
सरपंच भटू पाटील यांनी खलाणे गावातील 14 युवक सैन्य दलात असल्याचे सांगितले. तसेच योगेश आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शहीद झाला आहे. मात्र, देशातील प्रत्येक सैनिक योगेशचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भावना व्यक्त केली.