Thu, Jul 18, 2019 17:04होमपेज › Nashik › चांदवड, घोटीला ‘टोल’धाड!

चांदवड, घोटीला ‘टोल’धाड!

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 11:42PMचांदवड/घोटी : वार्ताहर

मुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ (ता. चांदवड) येथील इरकॉन सोमा टोलवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून टोल दरवाढ करणार असल्याने चारचाकी वाहनधारकांच्या खिशाला झळ बसणार आहे. दुसरीकडे घोटी टोल कंपनीने 5 ते 20 रुपयांनी वाढ केली आहे. कार व जीपला मात्र या वाढीतून वगळण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून मंगरूळ येथील इरकॉन सोमा टोलवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महामार्गाने प्रवास करणार्‍या वाहनधारकांकडून टोलवसुली करीत आहे. या टोलवसुलीत दरवर्षी वाढ होत असल्याने कंपनीचे इन्कम जोरात सुरू आहे. दुसरीकडे मात्र प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. दरवर्षी ज्याप्रमाणे टोलच्या दरात वाढ केली जाते. त्या मोबदल्यात टोल वसूल करणार्‍या  कंपनीकडून प्रवाशांना सेवा दिली जात नसल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्‍त केली जात आहे. मंगरूळ टोलनाक्यावर पूर्वी कार, व्हॅन, जीपसाठी प्रवाशांना प्रत्येकी 125 रुपये मोजावे लागत होते.

यात टोल कंपनीने पाच रुपयांची वाढ केल्याने वाहनचालकांना आता 130 रुपये द्यावे लागणार आहे. मालवाहतूक करणार्‍या हलक्या वाहनांच्या टोलमध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आली असल्याने आता 130 रुपये भरावे लागणार आहे. ट्रक व बस या आठ ते दहा चाकी वाहनांचा टोल 10 रुपयांनी वाढला असून, अशा वाहनांसाठी आता 450 रुपये टोल भरावा लागणार आहे. तर आठ चाकांपेक्षा जास्त चाके असलेल्या वाहनाच्या टोलमध्ये 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाहनासाठी 725 रुपये टोल द्यावा लागणार आहे. घोटी टोलनाक्यावर गेल्या सहा दिवसांपासून कर्मचारी वाढीव दराचे पत्रक वाटत असून, त्यामुळे आधीच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.