Tue, Mar 19, 2019 05:10होमपेज › Nashik › विधान परिषदेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र

विधान परिषदेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र

Published On: Apr 27 2018 12:58AM | Last Updated: Apr 26 2018 11:06PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या सहा जागांसाठी येत्या 21 मे ला होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. नाशिकमध्ये या निवडणुकीचे रण तापण्यास सुरुवात झाली असून, माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या गैरहजेरीत जागा राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. दुसरीकडे शिवसेनेने अगोदरच स्वबळाचा नारा देऊन उमेदवारही जाहीर केला असला तरी भाजपाने मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दोन्ही काँग्रेसची आघाडी, सेनेचे स्वबळ आणि भाजपाची चाचपणी, अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

तीनपेक्षा अधिक वेळा या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. स्वर्गिय डॉ. वसंत पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जयवंत जाधव निवडून आले. त्यानंतरच्या दुसर्‍या टर्ममध्ये झालेली निवडणूक चुरशीची होऊन जाधव यांचा निसटता विजय झाला. त्यावेळी राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असल्याने शिवाय पालकमंत्री म्हणून भुजबळ यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व असल्याने जाधव यांना दुसर्‍यांदा विधान परिषदेची पायरी चढणे शक्य झाले होते. तर शिवसेनेच्या उमेदवाराला दोन्हीही विजयाने हुलकावणी दिली होती. यावेळी मात्र राष्ट्रवादीसमोर जागा राखण्याचे आव्हान आहे. भुजबळ कारागृहात असून, मतदारसंख्याही कमी झाली आहे. अवघे 92 मतदार राष्ट्रवादीकडे आहेत. तर काँग्रेसकडे 58 मतदार आहेत.गेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्याने दोन्ही काँग्रेस विधान परिषदेच्या सहाही जागा आघाडी करून लढण्याची शक्यता आहे.

अर्थात, राष्ट्रवादीची त्यासाठी तयारी असून, गुरुवारी दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशस्तरावरील नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत  राष्ट्रीय  पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. दुसरीकडे, सेनेने आधीच स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करून नरेंद्र दराडे यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. यापूर्वी दोनदा निसटता पराभव पत्करावा लागला, यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत सेनेचाच उमेदवार विजयी होईल, असा छातीठोक दावा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

मित्र पक्ष असलेल्या भाजपाची मात्र सेनेच्या घोषणेने गोची झाली आहे.मित्र पक्षाने स्वबळाचा नारा दिला असला तरी भाजपाने अजून कोणतीही भुमिका स्पष्ट केली नसल्याने संभ्रमावस्था आहे. सेनेकडे सर्वाधिक 191 तर भाजपाकडे 166 याप्रमाणे मतदार आहेत. भाजपाकडून परवेझ कोकणी, केदा आहेर, गणेश गिते तसेच अ‍ॅड. शिवाजी सहाणे हे इच्छुक असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे यापैकी सहाणे आणि कोकणी यांनी गुरुवारी (दि.26) अर्जही नेले आहेत.

Tags : Nashik, nashik news, Legislative Council, both Congress, Together,