Wed, May 22, 2019 15:12होमपेज › Nashik › उत्तर महाराष्ट्रात आज गारपिटीची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात आज गारपिटीची शक्यता

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 1:18AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये गुरुवारी (दि. 22) कमाल तापमानाचा पारा 34 अंशावर स्थिरावला. वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (दि. 23) मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकर्‍यांनी काढणी केलेली पिकांची काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या बदलामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण असून, उष्णतेतही वाढ झाली आहे. दरम्यान, वातावरणाच्या या बदलाचा फटका काढणीला आलेल्या द्राक्षाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहे. दुसरीकडे शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मका, गहू व भाजीपाल्याला बसण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. नाशिकसह नगर, जळगाव व धुळे या जिल्ह्यांवर आज गारपिटीचे सावट आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतात काढून ठेवलेला माल योग्य ठिकाणी स्थलांतरीत करावा. अन्यथा तो झाकून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.