Fri, Apr 26, 2019 03:49होमपेज › Nashik › मालेगाव सायजिंग बंदचा आज निर्णय

मालेगाव सायजिंग बंदचा आज निर्णय

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 12:51AMमालेगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका प्रशासनाने अनधिकृत सायजिंग व प्लास्टिक कारखान्यांविरोधातील कारवाई स्थगित करुन कारखानदारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा अवधी द्यावा, अन्यथा बेमुदत सायजिंग युनिट बंद करण्यात येतील, असा इशारा मालेगाव सायजिंग असोसिएशनने बुधवारी दिला.

महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या समन्वय बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांनी हजारो मजूर, कामगारांच्या रोजगार रोखणे चुकीचे असल्याने एकाबाजुने कागदपत्रांनी पूर्तता व कायदेशीर पाठपुरावा सुरू ठेवावा, ते करत करताना यंत्रमाग उद्योगाची चाकेही फिरती ठेवावीत, प्रशासन पूर्णत: सहकार्य करेल, अशी शिष्टाई केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत असोसिएशनने गुरुवारच्या (दि. 26) बैठकीत योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली. हरित लवाद न्यायालयात प्रदूषणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या सुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेने अनधिकृत सायजिंगविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. तर कागदपत्र व ना हरकत दाखल्यांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी अत्यल्प अवधी दिला गेल्याने अन्यायाची भावना निर्माण झाल्याचा युक्तीवाद करत सायजिंग असोसिएशनने बेमुदत बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे यंत्रमाग कारखाने बंद होऊन हजारो मजुर, कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होईल. ही परिस्थिती टाळण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद कक्षात बुधवारी सायंकाळी सायजिंग व प्लास्टिक कारखानदारांची बैठक घेण्यात आली.

अर्थकारणाचा कणा असलेला यंत्रमाग उद्योग सायजिंग युनिटवर चालतो. त्यातील अपवादात्मक व्यक्तींच्या चुकीची शिक्षा सर्व कारखानदारांना मिळू नये, अशी भूमिका मांडली. शहरात 125 सायजिंग कारखाने आहेत, त्यातील 49 हे 50 वर्षांपूर्वीचे आहेत. हद्दवाढीमुळे अनेक कारखाने मनपा कार्यक्षेत्रात आले. त्यांच्या ग्रामपंचायतींची परवानगी आहे. काहींना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही केवळ हरित लवादाकडे दाखल याचिकेच्या सुनावणीच्या अनुषंगाने 24 कारखान्यांना सरसकट नोटीसा बजावण्यात आल्या आहे. जुने कागदपत्र सादर करण्यासही पुरेसा वेळ नसल्याचे कारखानदारांची कोंडी झाली असल्याची बाब यावेळी मांडण्यात आली.