Wed, Apr 24, 2019 07:42होमपेज › Nashik › निवृत्तिनाथांची आज शासकीय महापूजा

निवृत्तिनाथांची आज शासकीय महापूजा

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:36PM

बुकमार्क करा
त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त त्र्यंबकनगरी सजली असून, लाखोंच्या संख्येने वारकरी शहरात दाखल झाले आहेत. जणू वारकर्‍यांचा कुंभ त्र्यंबकेश्‍वरमध्ये अनुभवयास मिळत आहे. यात्रेनिमित्त नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावर वारकर्‍यांचा अखंड झरा वाहत आहे. नाथांच्या मंदिरात संत तुकारामांचे वंशज बाळासाहेब देऊकर यांचे आगमन झाले आहे. निवृत्तिनाथांच्या मंदिरासह आवारात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.12) शासकीय महापूजा होणार आहे.

त्र्यंबकच्या परिसरात सुरू असलेल्या कीर्तनांमुळे भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर संस्थान वारकर्‍यांच्या पताकांनी भगवेमय झाले आहे. सर्वच दिंड्यांचे  संस्थानतर्फे स्वागत करण्यात येत आहे. दर्शन बारीत असंख्य भाविक उभे आहेत.  सेवाभावी संस्थांमार्फत पेगलवाडी फाट्यावर मोफत वैद्यकीय सेवा दिली जात आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विश्‍वस्तांकडून नाथांची महापूजा

गुरुवारी रात्री 11 ते 1 पर्यंत संत निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे यांच्या हस्ते नाथांची महापूजा करण्यात आली. यावेळी सचिव पवनकुमार भुतडा, त्र्यंबक गायकवाड, जयंत गोसावी, पुंडलीक थेटे, पंडित कोल्हे, रामभाऊ मुळाणे, धनश्री हरदास, ललिता शिंदे, योगेश गोसावी, जिजाबाई लांडे आदी विश्‍वस्तांसह वारकरी उपस्थित होते.

आज निघणार नाथांची मिरवणूक 

शुक्रवारी (दि.12) दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत चांदीच्या रथातून संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुकांची मिरवणूक निघेल. वारकरी भजन म्हणत त्र्यंबकराजाच्या भेटीस जातील. संत निवृत्तिनाथ मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात होईल. यावेळी सुंदराबाई मठ, पोस्ट गल्लीमार्गे त्र्यंबकेश्‍वर मंदिरात मिरवणूक जाईल. कुशावर्तमार्गे नाथांच्या मंदिरात परत जाईल. संत मुक्‍ताबाई संस्थानतर्फे कीर्तन व जागर होईल. सकाळी काकडा, भजन होईल.दुपारी 3 ते सायंकाळी 5 पर्यंत कीर्तन यानंतर बाळासाहेब देहूकर महाराजांचे खिरापतीचे कीर्तन होईल.