Mon, Jul 22, 2019 03:29होमपेज › Nashik › पूर रोखण्यासाठी नदीतील अडथळे दूर होणार

पूर रोखण्यासाठी नदीतील अडथळे दूर होणार

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 23 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी

गोदावरीसह उपनद्यांच्या पुराचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने नदीपात्रातील अडथळे दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार  उपाययोजना केल्यास काय परिणाम होऊ शकतात याविषयीचा आघात अहवाल (इम्पॅक्ट रिपोर्ट) सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, पूररेषेचे पुन्हा एकदा नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पूरप्रभाव कमी होणार असल्याने नदीपात्रातलगत राहणार्‍या गावठाण भागासह इतरही भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीसीद्वारे गोदावरी नदीपात्राच्या पूररेषेचा आढावा घेतला. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आयुक्‍त तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर आडके हे उपस्थित होते. 2008 मध्ये आलेल्या महापुरानंतर मनपाने जलसंपदा विभागामार्फत पूररेषा निश्‍चिती करून घेतली. त्यासाठी जलसंपदाने पुणे येथील सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च सेंटरवर त्याची जबाबदारी सोपविली होती. नोव्हेंबर 2012 मध्ये पूररेषेबाबतचा अहवाल मनपाला प्राप्‍त झाला. मात्र, त्यानंतर दोन वर्षे या अहवालावर मनपाने कोणतीही कार्यवाही केली नाही. 2014 मध्ये आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा तसेच मंत्रालयात यासंदर्भात पत्रव्यवहार करून तसेच बैठका घेऊन पाठपुरावा केला. 2016 मध्ये शहराला पुन्हा महापुराला तोंड द्यावे लागले.

वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार गोदावरी तसेच नासर्डी (नंदिनी) नदीमधील नको असलेले पूल, बंधार्‍यांचे अडथळे दूर केल्यास पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. असे झाल्यास गोदावरीची ब्लू लाइन पूररेषेमधील पूर पातळी साडेतीन मीटरने तर नासर्डी नदीची पूर पातळी 1.86 मीटरने खाली येऊ शकते. त्याचबरोबर शंभर वर्षांचा विचार केल्यास गोदावरीतील रेड लाइनमधील पूर पातळी 3.83 मीटरने, तर नासर्डीची पूर पातळी 2.31 मीटरने खाली येऊ शकते. वॉटर अ‍ॅण्ड पॉवर सेंटरच्या अहवालावर अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्यास मेरीच्या महासंचालकांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे सध्या नासर्डीतील तिरडशेत, सातपूर-अंबड लिंक रोडवरील पूल, टाकळी तसेच सोनजे मळा येथील बंधारे हटविण्यात आले असून, उंटवाडी रोडवरील पुलाखालची खोली वाढविण्यात येणार असल्याचे आमदार प्रा. फरांदे यांनी सांगितले.