Sat, Jul 20, 2019 10:48होमपेज › Nashik › अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडणार

अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडणार

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:27PMनाशिक : प्रतिनिधी

शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याबाबत मान्यता देण्यात आली असून, जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या दोन्ही अधिकार्‍यांमध्ये समग्र शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. या अभियानात मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने चालू वर्षापासून समग्र शिक्षण अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. 

शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये येणार्‍या मुलांचे औपचारिक तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण योग्य झाले तर ही मुले भविष्यात चांगली प्रगती करतील. अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम दिल्यास आणि त्यावर शिक्षण विभागाने नियंत्रण ठेवल्यास हे अभियान उत्तमप्रकारे राबविता येईल, असे गिते यांनी पटवून दिले. नंदकुमार यांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास मान्यता दिली. त्यानुसार सिन्‍नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा 100 टक्के प्रगत करण्यासाठी या तालुक्यात पायलट कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

सुरगाणा तालुक्यातील अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध बोलीभाषेच्या माध्यमातून भाषिक क्षमतांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत विशेष कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणित आणि भाषा यावर विशेष भर देण्यात येणार असून, मूलभूत वाचन, गणित प्रशिक्षण देऊन संनियंत्रण करण्यात येणार आहे. सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या सरल पोर्टलवर ही माहिती जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 

 

Tags : nashik, nashik news, primary school, anganwadi, connect,