होमपेज › Nashik › त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात तीन अनधिकृत शाळा

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात तीन अनधिकृत शाळा

Published On: Jun 27 2018 12:18AM | Last Updated: Jun 27 2018 12:10AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळा बंद करण्याचा केवळ फार्स केला जात असून, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात अजूनही तीन अनधिकृत शाळा असल्याची बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदारी संस्थाचालकांवर सोपवून शिक्षण विभाग नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करीत आहे.

दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस आधी शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाते. शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात म्हणून नोटिसा बजाविण्याचे केवळ सोपस्कार पार पाडले जाते. पण, संबंधित संस्थाचालकांकडून या नोटिसांना केराची टोपली दाखवून शिक्षण विभागाच्या नाकावर टिच्चून बिनधास्तपणे शाळा सुरू ठेवल्या जात असल्याचेही अनेकदा निदर्शनास आले आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील बडा उदासीन आखाडा परिसरातील ज्ञानज्योत अकॅडमी, निवृत्तिनाथ मंदिराच्या मागील ब्लूमिंग बर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, पाच आळी परिसरातील बालाजी इंटरनॅशनल स्कूल या शाळा सद्यस्थितीत सुरूच आहेत.

या शाळा बंद करण्यात याव्यात म्हणून पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी नोटिसा बजाविल्या पण, शाळांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा सादर केला नाही. त्यानंतर शाळांच्या दर्शनी प्रवेशद्वारावर अनधिकृत शाळा असा फलक लावण्यात आला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 च्या कलम 18 (5) नुसार मान्यता नसताना शाळा सुरूच राहिल्यास एक लाख रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच, प्रत्येक दिवसासाठी दहा हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. गटशिक्षणाधिकार्‍यांनी या शाळांना दंडाचीही नोटीस बजावली असली तरी प्रत्यक्षात दंड वसूल झाल्याविषयीही साशंकता आहे.  दुसरीकडे या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदारी शाळांचीच राहील, असे सूचित करताना गटशिक्षणाधिकार्‍यांनी जबाबदारीच झटकली आहे. मुळात या शाळाच अनधिकृत आहे शिवाय त्या नोटिसांनाही जुमानत नाही. असे असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुक सान झाल्यास त्यांच्याविरोधात नेमकी कोणती पावले उचलली जातील, हे मात्र गटशिक्षणाधिकार्‍यांनी स्पष्ट करून दिले नाही.