होमपेज › Nashik › वाळूमाफियांनीच पळविले जप्त केलेले तिन्ही ट्रक!

वाळूमाफियांनीच पळविले जप्त केलेले तिन्ही ट्रक!

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 12:55AMनाशिक : प्रतिनिधी

अधिकार्‍यांवर जीवघेणे हल्ले करणार्‍या वाळूमाफियांची मजल आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेली वाहने पळवून नेण्यापर्यंत पोहोचली आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 16) रात्री घडला आहे. जप्त केलेली तिन्हीही वाहने माफियांनी पळवून नेली आहेत. जिल्ह्याच्या मुख्यालयातच हा प्रकार घडल्याने तहसिल प्रशासन संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

शहरात अवैधरित्या वाळू आणणारी तीन वाहने तलाठ्यांनी जप्‍त करत ती जिल्हाधिकारी कार्यालयातील नाशिक तहसिल कार्यालयाच्या आवारात उभी केली. जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांना प्रशासनाने दंडाच्या नोटीसा बजावल्या होत्या. दरम्यान, तीनपैकी एका वाहनाच्या मालकाने पहिल्या टप्प्यात 13 हजार रूपयांचा भरणाही केला. मात्र, उर्वरित दोन वाहनांच्या मालकांनी शुक्रवारी (दि.16) रात्री दंड भरला नव्हता. दरम्यान, ही तिन्ही वाहने कार्यालयाच्या परिसरातून पळवून नेली. कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही व रात्रीचे सुरक्षारक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षितेतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

मार्च एन्डजवळ आल्याने जिल्हा प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात मोहीम उघडली आहे. त्यानुसार तत्कालीन नाशिक प्रातंधिकारी अमोल येडगे यांनी वाळूमाफियांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली होती. याचाच एक भाग म्हणून येडगे यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. कार्यालयातील तसेच सेतूमधील बेबंदशाहीला लगाम घालणे हा त्यामागील मुळ उद्देश होता. परंतु, येडगेंची बदली होताचा संबंधित कॅमेर्‍यांची दिशाही बदलण्यात आली आहे. ही दिशा कोणी व का बदलली याबाबत गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी माफियांनी थेट जप्त केलेली वाहनेच पळविल्याने त्यांना कोणाची फुस आहे का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची दखल घेतली असल्याचे समजते. याबाबत चौकशीचेही संकेत मिळत आहेत.

सुरक्षा ऐरणीवर!

जिल्हाधिकारी कार्यालयातील यापूर्वी दोन ते तीन वेळेस चोरीच्या घटना घडल्या होेत्या. यामध्ये संगणक तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच रात्रीच्या सुमारास प्रशासनाने चार सुरक्षारक्षक नेमले आहे. मात्र, अशा परिस्थितीत वाहने पळवून नेल्याने कार्यालयाची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे.