Mon, Aug 19, 2019 05:02होमपेज › Nashik › देशातील तीन मुद्रणालये गांधीनगर प्रेसमध्ये विलीन?

देशातील तीन मुद्रणालये गांधीनगर प्रेसमध्ये विलीन?

Published On: Dec 28 2017 1:45AM | Last Updated: Dec 28 2017 1:42AM

बुकमार्क करा
उपनगर : हर्षवर्धन बोर्‍हाडे

कर्नाटक व तामिळनाडूतील तीन मुद्रणालये नाशिकच्या गांधीनगर प्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे वृत्त असून, यामुळे गांधीनगर प्रेसला ऊर्जितावस्था मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. याशिवाय शहरातील रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची शक्यता आहे. 

तामिळनाडूतील कोईम्बतूरच्या पेरियन्यीकेनपल्यम शहरातील सरकारी प्रेसचे उत्पादन या महिन्याअखेरपर्यंत थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे हे प्रेस नाशिक येथील गांधीनगर प्रेसमध्ये विलीन केले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटकातील कोराटी आणि म्हैसूर येथील दोन सरकारी प्रेसही गांधीनगर प्रेसमध्ये विलीन होणार आहेत. 

स्थलांतराचे काम युद्धपातळीवर

पहिल्या टप्प्यात सरकार कोईम्बतूर, कोराटी आणि म्हैसूर या तीन प्रेस गांधीनगर प्रेसमध्ये विलीन करणार आहे. कोईम्बतूर प्रेसमध्ये 66, कोराटीमध्ये 28 आणि म्हैसूर येेथे 25 कामगार आहेत. ते जानेवारीत गांधीनगरला स्थलांतरित होतील, असा अंदाज आहे. स्थलांतरित कामगारांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, त्यांचे जानेवारीचे वेतन गांधीनगरच्या प्रेसमधून केले जाणार आहे, असे बोलले जात आहे. 

कार्यवाहीला कोईम्बतूरपासून सुरुवात

सरकारने तांत्रिक कारणास्तव देशातील 18 सरकारी छोट्या प्रेस बंद करून फक्‍त पाचच प्रेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पाच प्रेसमध्ये नाशिकच्या गांधीनगर प्रेसचा समावेश आहे. प्रेस बंद करण्याची सुरुवात कोईम्बतूरपासून होत आहे. 1964 साली 132 एकर जागेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या प्रेसचे उत्पादन 31 डिसेंबरपासून थांबविण्यात येणार आहे. प्रेसची सुरुवात झाली तेव्हा साधारण 900 कामगार होते. 1990 ते 95 दरम्यान अनेक कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर सरकारने भरती केली नाही. आता या प्रेसमध्ये उरलेल्या 66 कामगारांना नाशिकच्या गांधीनगर प्रेसमध्ये पाठविण्यात येणार आहे. कामगारांची 463 निवासस्थाने असून, ती मोडकळीस आली आहेत. दरम्यान, प्रेस बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला या प्रेसमधील कामगार संघटनेचे नेते आणि कामगार यांनी विरोध केला आहे.