Wed, Jul 17, 2019 10:16होमपेज › Nashik › इगतपुरी तालुक्यात तिहेरी हत्याकांड

इगतपुरी तालुक्यात तिहेरी हत्याकांड

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 11:45PMघोटी : वार्ताहर

इतका शिकला असूनही तुला नोकरी लागत नाही, असे वारंवार डिवचल्याच्या कारणावरून एकाने सासू-सुनेसह एका चिमुरड्याचा खून केल्याची घटना शनिवारी (दि.30) इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथे घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने वातावरण तप्त झाले होते. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावास शांततेचे आवाहन करीत संशयितास ताब्यात घेतले.

याबाबत माहिती अशी की, माळवाडी येथे सकाळी 9.30च्या दरम्यान हिराबाई शंकर चिमटे (55) या आपल्या नातवासह घरात बसलेल्या होत्या. तर सून मंगला गणेश चिमटे (30) घरातील केराची टोपली टाकण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी संशयित आरोपी सचिन गणपत चिमटे (23) याने मंगला यांना एकटे पाहून धारदार चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केले. यात त्या जागीच कोसळल्या. मंगलाचा मुलगा यश (6) याने हा प्रकार बघताच याबाबत आपल्या आजीला माहिती दिली. तोपर्यंत संशयिताने मंगला हिस घरात ओढत आणले होते. सासू हिराबाई यांनी सचिनला जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांनी हिराबाई यांच्या गळा आणि मानेवर धारदार चाकूने वार केले. या घटनेत हिराबाई जमिनीवर कोसळल्या. एवढ्यावरच न थांबता संशयिताने रोहित (4) याच्यावरही वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. दुसरा नातू यश (6) हा घरातून पळून जात असताना संशयिताने त्याच्याही गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता यशने आपला उजवा हात पुढे केल्याने तो जखमी झाला. यशने आपला जीव वाचवत गावातील मुख्य रस्त्यावर धाव घेत नागरिकांना घटनेची माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीस चांगलाच चोप दिला.

घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना होत आरोपीस ताब्यात घेत जमावास शांत केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती तालुक्यात पसरताच लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी रुग्णालयात एकाच गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य पाहता शवविच्छेदनासाठी मृतदेह  जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, संशयित आरोपीच्या आई, वडील आणि दोन बहिणींना खबरदारी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

जमिनीच्या वादातून हत्याकांड

वर्षभरापूर्वी पाच भावांमध्ये जमीन वाट्याला कमी आली होती. त्यावरून वाद विकोपाला गेला होता. चाळीस एकर जमीन मयत वडील बंधू हरी नामदेव चिमटे यांच्या नावावर होती. चार वर्षापूर्वी हरी हे मयत झाल्यावर उर्वरित चार भावांत झालेले हिसे मनासारखे झाले नव्हते. त्यातून लक्ष्मण, शंकर, भीमा, गणपत चिमटे यांच्यात वर्षभरापूर्वी भांडण झाले होते. मात्र, संशयित आरोपी सचिन गणपत चिमटे ह्याच्या मनात चुलते शंकर यांच्याबाबत राग कायम होता. संधीचा फायदा घेत आरोपीने शनिवारी तिघांचा खुन केल्याची कबुली दिली आहे.