Wed, Nov 21, 2018 01:06होमपेज › Nashik › निफाडमध्ये दहा दिवसांत तीन शेतकर्‍यांची आत्महत्या

निफाडमध्ये दहा दिवसांत तीन शेतकर्‍यांची आत्महत्या

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 11:17PMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दहा दिवसांत तीन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांमध्ये दोन युवा शेतकर्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 61 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. निफाडसारख्या कृषिप्रधान तालुक्यातही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. पावसाचे कमी प्रमाण, परिणामी घटलेले शेतमालाचे उत्पन्न आणि घसरलेले शेतमालाचे भाव आदी कारणे आहेत. दरम्यान, तालुक्यात 9 ते 19 ऑगस्ट या काळात तीन शेतकर्‍यांनी जीवनप्रवास संपविला आहे. त्याबाबत तालुका प्रशासनाकडून शुक्रवारी (दि. 24) प्राथमिक अहवाल जिल्ह्याच्या मुख्यालयी प्राप्त झाले आहे.

तालुक्यातील उगाव येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार (63) आणि नांदुर्डीचे शेतकरी योगेश भरत खैरे (35) यांनी रेल्वेमार्गावर आत्महत्या केली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला खडक माळेगावमधील शेतकरी शशिकांत पंडित भोसले (39) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, एकट्या निफाड तालुक्यातील नऊ शेतकर्‍यांनी जीवनप्रवास संपविला आहे.