Thu, May 23, 2019 14:58
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नांदूरमध्यमेश्‍वर कालव्यात तिघे बुडाले

नांदूरमध्यमेश्‍वर कालव्यात तिघे बुडाले

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 20 2018 1:17AMयेवला : प्रतिनिधी

तालुक्यातील उत्तर-पश्‍चिम भागातील महालखेडा येथे नांदूर मध्यमेश्‍वर एक्स्प्रेस कालव्यामध्ये शेतकरी कुटुंबातील दोन चिमुकल्या शाळकरी बंधूसह वडील वाहून गेले. या घटनेला सहा तास उलटूनही जिल्हा प्रशासनाने कालव्याचे पाणी बंद न केल्याने मृतदेहांची शोधमोहीम होऊ शकली नाही. रात्री उशिरापर्यंत पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी बंद नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट होती.

कांद्याला फवारणी करण्याच्या पंपामध्ये पाणी भरण्यासाठी महालखेडा शिवारातील नांदूरमध्यमेश्‍वर एक्स्प्रेस कालव्यालगत असलेल्या सोमनाथ शिवराम गिते यांच्या शेतातून त्यांचा मोठा मुलगा कार्तिक (14) हा कालव्यातील पाणी घेण्यासाठी प्रथम बादली घेवून उतरला. यावेळी सिमेंट अस्तरीकरण असलेल्या कालव्याला असलेल्या पायर्‍यांवरून कार्तिकचा पाय घसरल्याने तो कालव्यात पडला. कालव्याच्या वेगवान प्रवाहात कार्तिक वाहून जात असल्याचे बघून त्याचे वडील सोमनाथ गिते (40) हे त्यास वाचविण्यासाठी गेले असता त्यांचाही पाय घसरुन ते कालव्यात वाहून जावू लागले. हे बघताच बघितल्याने लहान मुलगा सत्यम (12) यालाही न राहवल्याने त्याने कालव्याकडे धाव घेतली. त्यात सत्यमही पाय घसरून कालव्याच्या प्रवाहात वाहत गेला. दरम्यान, ही घटना घडत असतानाच तेथे उपस्थित असलेले सोमनाथचे काका अमोल गिते (36) यांनीही कालव्याकडे धाव घेतली. मात्र, अमोल गिते हे घसरून पडत असताना सुरेश मोरे या 19 वर्षीय मुलाने त्यांना वाचविले.

घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच सोमनाथ गीतेंचा चुलत भाऊ भूषण गिते याने पोलीस पाटील सजन पवार यांना माहिती दिली. घटना घडल्यानंतरही पाटबंधारे प्रशासनाने उदासीनता दाखवली. सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रशासनाकडून दोन पोलीस वगळता एकही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता. दरम्यान, रात्री आठ वाजेच्या दरम्यान कालव्याचे पाणी पूर्णतः बंद केल्याची माहिती सहाय्यक अभियंता ससाणे यांनी दिली. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देत आढावा घेतला.