Wed, Nov 14, 2018 22:59



होमपेज › Nashik › मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले

मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 10 2018 11:58PM



इगतपुरी : वार्ताहर

मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईहून हावडाकडे जाणार्‍या एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना इगतपुरी रेल्वेस्थानकाजवळ घडली. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर चार तासानंतर रूळावरील डबे हटविण्यात यश आले. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्पच होती. या घटनेमुळे मनमाडहून मुंबईला जाणार्‍या बर्‍याच एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबईहून हावडाकडे जाणार्‍या मेलचे तीन डबे इगतपुरी रेल्वेस्थानकाजवळील तीन लकडी पुलाजवळ घसरल्याने दोनही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातात प्रवाशांना किरकोळ मार लागला असून, मोठी जीवितहानी टळली. अपघाताची माहिती समजताच रेल्वे प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन युध्दपातळीवर घसरलेले डबे हटविण्याचे काम सुरू केले. हावडा मेलचे उर्वरित डबे कसारामार्गे पाठीमागे नेऊन पुन्हा इगतपुरी रेल्वेस्थानकात आणून प्रवाशांची सुटका करण्यात आली. त्यानंतर प्रवासी इतर गाड्यांनी मार्गस्थ झाले. या अपघातामुळे रात्री दोन ते सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईला जाणारी व नाशिकला येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.