Wed, May 22, 2019 10:34होमपेज › Nashik › अवैध दारू वाहतूक प्रकरणी तिघांना अटक

अवैध दारू वाहतूक प्रकरणी तिघांना अटक

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 11:43PMनाशिक : प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात दोन ठिकाणी सापळा रचून अवैध मद्यवाहतूक करणार्‍या तिघा संशयितास पकडले आहे. तसेच, या प्रकरणी चार वाहनेही जप्‍त केली असून, वाहनांमधील सुमारे तीन लाख रुपयांची अवैध दारू पथकाने जप्‍त केली आहे. 

दादरा नगर हवेलीनिर्मित मद्यसाठा जिल्ह्यात येत असल्याच्या माहितीवरून भरारी पथकाच्या युनिट 1 व येवला निरीक्षकांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्र्यंबक तालुक्यातील चारीचा माळ मुलवड ओझर शिवारातून दुचाकीवर मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती अधीक्षक चरणसिंग राजपूत व उपअधीक्षक गणेश बारगडे यांना मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपआयुक्‍त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी एकच्या पथकाने परिसरात सापळा लावला. त्यावेळी संशयित लक्ष्मण रामू नानकडे (22) व लक्ष्मण डिगू वड (27 रा.मुलवड, ता. त्र्यंबकेश्‍वर) व त्यांचा एक साथीदार वेगवेगळ्या तीन दुचाकींवरून अवैध मद्य वाहतूक करताना सापडले. त्यातील एका संशयित पथकाची चाहूल लागताच पसार झाला. संशयितांकडून परराज्यातील देशी दारू आणि बिअर असा सुमारे एक लाख 98 हजार 736 रुपये किमतीचा दारूसाठा जप्‍त करण्यात आला आहे. पोलिसानीं दोघा संशयितांना अटक केली आहे. निरीक्षक एम. एम. राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अरुण सुत्रावे, जवान विलास कुवर, सुनील पाटील, विष्णू सानप, पूनम भालेराव, चालक वीरेंद्र वाघ आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

दुसरी कारवाई येवला विभागाच्या पथकाने येवला तालुक्यातील धामोरी सत्यगाव रस्त्यावर करण्यात आली. सतीश रंगनाथ जर्‍हाड (43, रा. कोपरगाव) हा चालक एमएच 14 एएम 9320 क्रमांकाच्या वाहनातून मद्य वाहतूक करताना सापडला. वाहन तपासणीत देशीदारूचा साठा आढळला. या कारवाईत पथकाने एक लाख चार हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. येवला विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक पांडुरंग कुडवे, वाय. पी.रतवेकर, जी. एन. गरूड, के. आर. चौधरी, चालक डी. आर. नेमणार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.