नाशिक : प्रतिनिधी
गुंतवणुकीचे आकर्षण दाखवून गुंतवणूकदारांना गंडवणार्या मिरजकर सराफ पेढीचे संचालक महेश मिरजकर यांच्यासह इतर दोघा महिला संशयितांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शहरातून अटक केली आहे. महेश मिरजकर आणि कीर्ती नाईक या दोघांना जनार्दन स्वामी मंदिरातून तर प्राजक्ता कुलकर्णी यांना इंद्रकुंड परिसरातून अटक केली आहे. जुलै महिन्यात सरकारवाडा पोलीस ठाण्यात मिरजकर सराफ आणि त्रिशा जेम्स या दोन सराफ पेढ्यांच्या संचालक व कर्मचारी असे 12 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित फरार झाले होते. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आशुतोष चंद्रात्रे यास अटक केली होती. त्यानंतर शनिवारी (दि.4) गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या गुन्ह्यातील मुख्य संशयित महेश मिरजकर यांच्यासह कीर्ती नाईक आणि प्राजक्ता कुलकर्णी यांना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, रवि सहाणे आणि पोलीस शिपाई ललिता अहिरे यांच्या पथकाने संशयितांना अटक केली आहे.