Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Nashik › संविधान माहीत नसणार्‍यांना टीकेचा अधिकार नाही

संविधान माहीत नसणार्‍यांना टीकेचा अधिकार नाही

Published On: Jul 04 2018 2:17AM | Last Updated: Jul 03 2018 10:59PMनाशिक : प्रतिनिधी

ज्यांना संविधान नीट माहीत नाही, अशा लोकांनी संघ व भाजपावर संविधान बदलण्याचा आरोप करणे हा या सहस्रकातील सर्वांत मोठा विनोद असल्याची टीका ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी केली. संविधान हा राजकीय चर्चा व सवंग आरोप-प्रत्यारोपांचा विषय नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

बंडोपंत जोशी यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त प्रसाद सोशल गु्रप व राष्ट्रीय विचार प्रबोधिनी यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्रसाद मंगल कार्यालय येथे मंगळवारी (दि. 3) झालेल्या व्याख्यानात पतंगे यांनी ‘आम्ही व आमचे संविधान’ या विषयावर विचार मांडले. त्यांनी संविधानाचा जागतिक इतिहास अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडून दाखवत भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीप्रक्रियेवर प्रकाश टाकला. ‘संविधान’ ही चार अक्षरे सोडल्यास संविधानाविषयी काहीही ठाऊक नसणारी माणसे संघ विचारधारेवर टीका करीत आहेत. संविधान समजून घेणे अत्यंत अवघड काम आहे. ब्रिटनमध्ये सन 1215 च्या सुमारास उमरावांनी राजाकडून 63 कलमांचा कायदा लिहून घेतला. ती जगातील पहिली सनद होय. सन 1688 ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ‘मूलभूत अधिकार’ या संकल्पनेचा उगम झाला, तर पहिले लिखित संविधान अमेरिकेने तयार केले. संविधानात महासत्ता घडविण्याची ताकद आहे. भारतात सन 1895 मध्ये लोकमान्य टिळक यांनी पहिली राज्यघटना तयार करून लोकशाहीची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचे टीकाकार असूनही त्यांना राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, असेही ते म्हणाले.  

आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके, भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर, माजी महापौर दशरथ पाटील, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, राजाभाऊ मोगल, माजी आमदार निशिगंधा मोगल, मंगला जोशी, दिनकर पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ‘सक्षम’ या सेवाभावी संस्थेचा गौरव करण्यात आला. देवदत्त जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रणव गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप देशमुख यांनी आभार मानले. वर्षा डांगरीकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. 

नेहरू हिमालयाएवढे!

पंडित नेहरूंचे नाव काढल्यावर संघ विचारधारेची माणसे झुरळ झटकल्यासारखे करतात. मात्र, देशात लोकशाही स्थिर करण्यात नेहरूंचे योगदान हिमालयाएवढे होते, असे पतंगे म्हणाले. याशिवाय घटना समितीत सर्व विचारधारांच्या व्यक्‍तींना स्थान देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.