Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Nashik › तीस अधिकार्‍यांचे वेतन कापणार

तीस अधिकार्‍यांचे वेतन कापणार

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 12:44AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तालुकास्तरीय आढावा बैठकीसंदर्भात सूचना करण्यासाठी आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सला दांडी मारणार्‍या 30 अधिकारी-कर्मचार्‍यांचे वेतन कापण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने कामचुकारपणा करणार्‍यांना दणका बसला आहे. आज तालुकास्तरीय खातेप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून विविध विषयांबाबत सूचना केल्या. 

प्रशासकीय कामकाज तसेच विकास योजना  विहित वेळेत पूर्ण करण्याकडे अधिक भर दिला जात असून,  त्यादृष्टीने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच गुणांकन करून त्याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. तालुका व ग्रामस्तरावरील कामकाज गतिमान व्हावे यासाठी तालुकास्तरीय आढावा बैठका लावण्यात आल्या आहेत. या बैठकींच्या अनुषंगाने गिते यांनी जिल्हास्तरीय खातेप्रमुखांसोबत तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी तसेच अन्य सर्व विभागप्रमुखांशी  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी गिते यांनी प्रलंबित विषयांची माहिती तत्काळ तयार करून आढावा बैठकीपूर्वी जिल्हा स्तरावर पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व ध्वजांकित योजनांचे गुणांकन तयार करून त्यानुसार बैठकीत माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या.

तालुकास्तरावर बैठकीच्या आदल्या दिवशी गटविकास अधिकार्‍यांनी गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन शिबिर घेऊन त्याद्वारे सर्व कर्मचार्‍यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  तसेच याच दिवशी सर्व कर्मचार्‍यांचे मत्ता व दायित्व संकलित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, केलेल्या कार्यवाहीचे प्रमाणपत्र  गटविकास अधिकार्‍यांनी तालुका बैठकीत सादर करावयाचे आहे. जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख आढावा बैठकीच्या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 पर्यंत सर्व गोपनीय अहवालांचे पुनर्विलोकन करणार आहेत. यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्स, आढावा बैठक असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणाचीही रजा मंजूर न करण्याचे आदेशही सर्व गट विकास अधिकारी व खातेप्रमुखांना देण्यात आले. या बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, प्राथमिक शिक्षण अधिकारी वैशाली झनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जे. सोनकांबळे, कार्यकारी अभियंता राजेंद्र देसले आदी उपस्थित होते.

यांचे कापणार वेतन

तालुकास्तरावरील वित्त विभागातील तीन सहायक लेखाधिकारी, कृषी विभागातील आठ कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी, शिक्षण विभागातील एक गट शिक्षणाधिकारी, पशुसंवर्धन विभागातील चार अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग पूर्व व  पश्‍चिमचे दोन अधिकारी, चार तालुका वैद्यकीय अधिकारी, एक बालविकास अधिकारी, सुरगाणा गटविकास अधिकारी, बांधकाम विभागातील सहा उपअभियंता असे एकूण 30 अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन कापण्यात येणार आहे.

Tags : Nashik,  Thirty, officers, cut, salary