Wed, Mar 20, 2019 02:33होमपेज › Nashik › येवला शहरातील दरोड्यात एक लाखाचा ऐवज लंपास

येवला शहरातील दरोड्यात एक लाखाचा ऐवज लंपास

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:27PM

बुकमार्क करा
येवला : प्रतिनिधी

शहरातील आनंदनगर येथील सारंगधर आव्हाड यांच्या बंगल्यावर शनिवारी (दि.13) दरोडा टाकून एक लाख 6 हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील साठफुटी रोडजवळील आनंदनगर येथील प्लॉट नंबर 25/अ मध्ये पालखेड पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता सारंगधर आव्हाड यांचा सुसज्ज बंगला असून, या बंगल्याचे दोन्ही प्रवेशद्वार सुरक्षेच्या दृष्टीने सुस्थितीत असतांनाही बंगल्याच्या मागील दरवाजाचा पहाटे तीन वाजेदरम्यान कडी कोंयडा तोडून तीन व्यक्‍तींनी बंगल्यात प्रवेश केला तर उर्वरित 3 ते 4 व्यक्‍ती बंगल्याच्या परिसरात दबा धरुन बसल्याचे दिसून आल्याची तक्रार आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. खोट्या पिस्तूलचा धाक दाखवत चोरट्यांनी 18 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व एक तोळे वजनाचे कानातील दागिने, 25 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, 10 हजार रुपये किमतीचे कानातील झुले, 29 हजार किमतीचे दोन मोबाइल, 4 हजार रुपये रोख रक्‍कम असे एकूण 1 लाख 6 हजाराचा ऐवज धाक दाखवत चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,  पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. दिवसेंदिवस घरफोड्यांमध्ये होणारी वाढ ही चिंतेची बाब असून, यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.