Sat, Jan 19, 2019 04:23होमपेज › Nashik › अफवा पसरविणार्‍या युवकास नाशिकमध्ये अटक

अफवा पसरविणार्‍या युवकास नाशिकमध्ये अटक

Published On: Jul 04 2018 2:17AM | Last Updated: Jul 03 2018 11:11PMनाशिकरोड : येथील एका गॅरेजमध्ये काम करणारा व्यक्‍ती मुलांचे अपहरण करीत असून, त्याचा फोटो आणि व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍या व्यक्‍तीला उपनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर अफवा पसरवून समाजात शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल केला.

अफजर हैदर मुलतानी (23, विहितगाव, मथुरारोड, हांडोरे मळा) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्याचे विहितगाव परिसरात गॅरेज आहे. अफजर मुलतानी हा लहान मुलांना चोरून नेत असून, त्याचा फोटो आणि व्हीडोओ कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. उपनगर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. तपास केल्यावर तक्रारदार अफजर मुलतानी याचा चुलतभाऊ गुलाब रसूल मुलताणी यानेच व्हॉटस्अपवर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तीन महिन्यांपूर्वी काढलेला फोटो आणि शुटिंग व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून मुले चोरणारा व्यक्‍ती अशी अफवा पसरवली, अशी कबुली त्याने दिली आहे. तसेच आपण केलेले कृत्य चेष्टा-मस्करी म्हणून केेले होते, असा खुलासा    संशयित गुलाब मुलताणी याने पोलिसांकडे केला आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मुले चोरणारी टोळी म्हणून पाच लोकांची जमावाने हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकरोड परिसरात अशाप्रकारची अफवा पसरविणारा प्रकार उघडकीस आला आहे.