Fri, Jul 19, 2019 22:08होमपेज › Nashik › आरोप योग्य की अयोग्य न्यायालये ठरवतील

आरोप योग्य की अयोग्य न्यायालये ठरवतील

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 10:58PMनाशिक : प्रतिनिधी

नेतेमंडळीवर झालेले आरोप हे योग्य की अयोग्य हे  ठरविण्याचे काम न्यायालयाचे असून, ते त्यांना करू द्यावे, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही असे सांगत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे आमदार छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या फाइलवर सही करताना सदसद्विवेकबुद्धीचा वापर करणे आवश्यक होते, असा चिमटाही त्यांनी भुजबळांना काढला. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासाठी भाजपा म्हणजेच ‘जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ’ असे सांगतानाच ते पक्ष सोडणार नाहीत, असा विश्‍वासही मुनगंटीवार यांनी व्यक्‍त केला.

मुनगंटीवार गुरुवारी (दि. 14) नाशिक दौर्‍यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपामध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याने माजी मंत्री खडसे नाराज असल्याच्या प्रश्‍नावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, देशात स्वातंत्र्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांच्या रूपाने ओबीसी पंतप्रधान झाले आहेत. ओबीसींच्या शिक्षण, वसतिगृह तसेच रोजगार वाढीबाबत खडसेंची नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपा पक्षवाढीसाठी खडसे यांनी अपार मेहनत घेतली आहे. त्यामुळेच पक्षावर नाराज होऊन ते बाहेर पडतील, अशी कोणतीही शक्यता नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

आजचे नेते हे त्यांच्यावर आरोप झाल्यावर आपणच कसे योग्य आहोत हे सांगण्याचा प्रयत्नात इतर कसे चुकीचे आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी असे झाल्यास न्यायालयाला काही कामच उरणार नाही, असा उपरोधिक टोलाही भुजबळांना लगावला.   युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची कारवाई झाली होती. त्या फाइलवर मी फक्‍त स्वाक्षरी केल्याच्या आ. भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचा मुनगंटीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. मंत्री होताना राज्याच्या हिताचे निर्णय घेण्याची शपथ घेतली जाते. त्यामुळे एखादा मंत्री डोळे झाकून एखाद्या फाइलवर स्वाक्षरी करू शकत नाही.