Thu, Jul 18, 2019 04:37होमपेज › Nashik › पीककर्ज बंद झाल्याने बळीराजा चिंतेत

पीककर्ज बंद झाल्याने बळीराजा चिंतेत

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 10:29PMत्र्यंबकेश्‍वर  : वार्ताहर

तालुक्यातील शेतकर्‍यांना दोन वर्षांपासून पीककर्ज बंद झाल्याने विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे  शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले आहेत. नियमित कर्ज भरूनही शेतकरी पीककर्जापासून वंचित शेतकरी राहिल्याने बँकांनीच पुढाकार घेण्याची मागणी जोर धरत आहे.

नियमित कर्ज भरणार्‍यांनी स्वतःजवळील किंवा उसनवारी करून सोसायटीचे कर्ज फेडले. परंतु चालू वर्षी पीककर्जच न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकर्‍यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, शेतकरी मोर्चा काढण्याचे नियोजन करत आहे. 

पीककर्ज वाटप करून शासनाकडून दिलासा देण्यात येतो. परंतु पीककर्ज वाटप थांबवल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. टोमॅटो, विविध भाजीपाला, द्राक्षे या बागायती पिकांसाठी पीककर्जाचा आधार घेतला जातो; परंतु शेतकर्‍यांना विविध कार्यकारी सोसायटीच्या संयोगाने आर्थिक सहाय्य करणार्‍या जिल्हा बँकेने गेल्या दोन वर्षांपासून कर्जपुरवठा बंद केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.

सामूहिक राजीनाम्याची तयारी

तालुक्यातील हतबल असलेल्या शेतकर्‍यांच्या भावनांचा विचार करून राज्य शासन व जिल्हा बँक संचालक मंडळाचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. तसेच  सोसायटीचे संचालक शेतकर्‍यांना पीककर्ज न मिळाल्यास राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.