Mon, May 20, 2019 22:26होमपेज › Nashik › नायब तहसीलदारासह लिपिकाचे होणार निलंबन

नायब तहसीलदारासह लिपिकाचे होणार निलंबन

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 11:03PMनाशिक : प्रतिनिधी

मालेगावमधील बीएलओंच्या मानधन घोटाळ्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांच्या टेबलवर पोहोचला आहे. या घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळलेल्या नायब तहसीलदार व लिपिकाचे दोन दिवसांमध्ये निलंबन करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने गतवर्षी जिल्ह्यात मतदारयाद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांतील याद्या शुद्धीकरणाची जबाबदारी बीएलओंवर (बूथ लेव्हल ऑफिसर) सोपविण्यात आली होती. मात्र, मालेगाव मध्य मतदारसंघातील बहुतांश बीएलओंनी काम केले नसतानादेखील त्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांचे मानधन जमा करण्यात आले होते. दरम्यान, वरिष्ठांनी केलेल्या तपासणीअंती आर्थिक घोळ झाल्याचे उघड झाले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे यांच्या नेतृत्वात समिती गठीत करून चौकशी केली. या समितीने त्यांचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. 

अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार तहसील कार्यालयातील लिपिकाने बीएलओंच्या नावाखाली स्वत:चे नातेवाईक, घराच्या आजूबाजूचे रहिवासी तसेच ओळखींच्या नावे पैसे काढत अपहार केल्याचे समोर आले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे समितीने केेलेल्या चौकशीत संबंधित व्यक्तींनी हे पैसे आमच्या खात्यात कसे वर्ग झाले याबाबत माहिती नसल्याचे सांगितले आहे. तसेच, संबंधित मानधनाचे पैसे परत करण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, या सार्‍या प्रकारात तत्कालीन नायब तहसीलदारही जबाबदार असल्याचे समितीला आढळले आहे. 

चौकशी समितीने त्यांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. समितीच्या चौकशीत घोटाळा झाल्याचे तथ्य आढळले आहे. त्यामुळेच या प्रकरणी नायब तहसीलदार व संबंधित लिपिक यांच्यावर प्रथम निलंबनाची कारवाई तसेच नंतर सेवेतून बडतर्फ केले जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. 

कामात तत्काळ सुधारणा करा

मतदारयाद्या शुद्धीकरणाचे काम हे राष्ट्रीय कार्य आहे. ज्या बीएलओंनी (बूथ लेव्हल ऑफिसर) अद्यापही हे काम सुरू केलेले नाही, त्यांनी तत्काळ कामाला लागावे, अशी तंबी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली आहे. दरम्यान, यानंतर कामचुकारपणा करणार्‍या बीएलओंना निलंबित केले जाणार असून, प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत मे महिन्यापासून घरोघरी जाऊन मतदारयादीची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी बीएलओंची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, आजतागायत 176 बीएलओंनी निवडणूक शाखेतून साधे दप्‍तरही नेले नसल्याचे आढळले आहे. यामध्ये नाशिक शहरातील नाशिक मध्य, पूर्व, पश्‍चिम, देवळाली तसेच मालेगाव मध्य आणि बाह्य मतदारसंघातील बीएलओंचा समावेश आहे. परिणामी या सहाही मतदारसंघांतील कामाचा आलेख कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनीच या प्रकरणी लक्ष घातले आहे. 

जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 9) मतदारसंघातील अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी मतदारयादी अधिक अचूक करण्यावर भर द्यावा. त्यासाठी घरोघरी जाऊन यादीची पडताळणी करावी, नवमतदार नोंदणीवर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच मयत मतदाराचे नाव कमी करण्यापूर्वी सर्वतोपरी खात्री करून घेण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, नाशिक शहरातील चारही मतदारसंघांत काम कमी झाल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी मनपा अधिकार्‍यांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच तत्काळ हे काम हाती घेण्याच्या सूचनाही मनपा प्रशासनाला दिल्या. 

मतदारयादीचे काम हे राष्ट्रीय कार्य असून, त्यात टाळाटाळ करणार्‍या बीएलओंवर तत्काळ निलंबन करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना यावेळी दिले. बैठकीला पाचही मतदारसंघांतील मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी तसेच मनपाचे अधिकारी उपस्थित होते.